नळदुर्ग ,दि. २३


नळदुर्ग नगरपालिकेत घरकुल घोटाळ्यानंतर सर्वात मोठा घोटाळा हा गुंठेवारी घोटाळा झाला आहे. लोकप्रतिनिधींचा अधिकारी व कर्मचाऱ्यांवर वचक नसला की अधिकारी व कर्मचारी कसे मोकाट वागतात हे या गुंठेवारी घोटाळ्यावरून लक्षात येते. मात्र यामध्ये नाहक शहरांतील गरीबांची लुट  होते हे मात्र नक्की.या गुंठेवारी घोटाळ्याची वरीष्ठ पातळीवरून चौकशी झाल्यानंतर यामध्ये अनेकांचा हा असल्याचे उघड होणार आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी होत आहे. 



नळदुर्ग नगरपालिकेची स्थापना सन १९५६ साली झालेली आहे. नगरपालिकेच्या ६५ वर्षाच्या इतिहासात कधी नव्हे तो २००८ ते २०१२ या कालावधीत घरकुल घोटाळा गाजला. या घोटाळ्याप्रकरणी तत्कालीन आजी--माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी, नगरअभियंता, ठेकेदारासह तब्बल आठ जणांवर गुन्हा दाखल झाला असुन सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. यानंतर सध्या गाजत आहे तो गुंठेवारी घोटाळा. या गुंठेवारी घोटाळ्याने तर सध्या कळसच गाठला आहे. या घोटाळ्यासंदर्भात रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. शहरवासीयांनी निवडुन दिलेल्या नगराध्यक्ष, नगरसेवकांचा वचक जर न.प.च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नसेल तर हे अधिकारी आणि कर्मचारी कीती मोकाट वागतात हे या गुंठेवारी प्रकरणावरून लक्षात येते. नगरपालिकेत गुंठेवारी नियमधीन करतांना बहुतांश प्रकरणात नियमांची पायमल्ली केली गेली आहे. केवळ पैसा डोळ्यासमोर ठेऊन कांही दलालांमार्फत ही गुंठेवारी करण्यात आली आहे. आज अनेक नागरीकांकडुन भरमसाठ पैसे घेतले गेले आहेत. ज्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासुन नागरीक बंगले बांधुन राहीले आहेत आशा नागरीकांकडुनही त्यांना घरे पडण्याची धमकी देत त्यांच्याकडुन त्यांच्या जागेची गुंठेवारी करून ती जागा त्यांच्या नावे करून देतो म्हणुन जवळपास एका भागांतील १५ कुटुंबाकडुन प्रत्येकी ६० हजार रुपये घेतल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. असे प्रकार गुंठेवारीच्या नावाखाली शहरांतील अनेक भागात झाले आहेत. शासकीय नियमानुसार कुणाची गुंठेवारी होत असेल तर त्याला कुणाचा विरोध नाही मात्र गुंठेवारीच्या नावाखाली जर नागरीकांची अधिकाऱ्यांकडुन किंवा दलालांकडुन लुट होत असेल तर आशा अधिकारी व दलालांवर कारवाई ही झालीच पाहिजे. 


शासनाचा आदेश व शासनाच्या नियमानुसार गुंठेवारी नियमाधीन करून देणे हे न.प.च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे काम आहे. आज नगरपालिकेतील सी. सी. टीव्ही कॅमेरे बंद आहेत. हे कॅमेरे सुरू राहिले असते तर नगरपालिकेत दलालांचा कसा आणि किती वावर आहे हे लक्षात आले असते. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने तात्काळ नगरपालिकेतील सी. सी. टीव्ही कॅमेरे सुरू करावेत यासाठी सर्वच नगरसेवकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.गुंठेवारी नियमाधीन करीत असताना पुर्वीचे जागेचे नकाशे बदलण्यात आले आहेत. पुर्वीच्या नकाशामध्ये जितक्या रुंदीचे रस्ते होते त्या रस्त्यांची रुंदी कमी करून ते रस्ते अरुंद करून त्यामध्ये प्लॉटची निर्मिती करून ते प्लॉट आज विकले जात आहेत. वास्तविकपाहता जे जुने नकाशे आहेत ते कायम ठेऊनच गुंठेवारी करावा हा नियम आहे. त्याचबरोबर ओपन प्लेस, इनामी जमीन, ग्रीन बेल्ट याठिकाणीही गुंठेवारी करण्यात आली आहे. ही गुंठेवारी नियमाला धरुन आहे का याची चौकशी होणे गरजेचे आहे. 


नळदुर्ग शहर पत्रकार संघाने हा गुंठेवारीचा प्रश्न हातात घेतला आहे जोपर्यंत याची पुर्ण चौकशी होऊन यामध्ये दोषीं असणाऱ्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत नळदुर्ग शहर पत्रकार संघ विविध मार्गाने आंदोलन करणार आहे. तरीही कारवाई झाली नाही तर याप्रकरणी पत्रकार संघाच्या वतीने न्यायालयाचे दारही ठोठावले जाणार आहे.
                
 
Top