जळकोट,दि.२४ : मेघराज किलजे
घरासमोर बांधलेल्या म्हशीच्या अंगावर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण वाहिनीची विद्युत तार पडून एका म्हशीचा मृत्यू झाल्याची घटना तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथे घडली. ही घटना शुक्रवार (दि.२४) रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील जळकोट- जळकोटवाडी (नळ) या रस्त्यालगत असलेल्या संभाजीनगर भागातील रहिवासी भरत गोरख लोहार यांनी आठ दिवसापूर्वी मानमोडी येथून मुरा जातीची एक म्हैस खरेदी केली होती. ही म्हैस घरासमोर बांधले असता , शुक्रवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घरासमोरून गेलेली महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीची वीजवाहिनीची विद्युत तार म्हशीच्या अंगावर पडल्याने म्हशीचा जागीच मृत्यू झाला. या म्हशीची किंमत ७५०००रु. असून या घटनेमुळे त्यांचे नुकसान झाले आहे.
या घटनेचा पंचनामा जळकोटचे तलाठी तात्यासाहेब रुपनवर यांनी केला आहे. या पंचनाम्यावर मेघराज किलजे, संजय घोडके, माणिक मडोळे, सुनील साखरे, अशोक दूधभाते यांच्या स्वाक्षर्या आहेत.