तुळजापूर ,दि . 30 

महाराष्ट्राची कुलस्वमीनी श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवा पूर्वीच्या मंचकी निद्रेस बुधवारी दि.२९ रोजी सायंकाळी सुरूवात झाली आहे. सायंकाळच्या अभिषेक पूजेनंतर तुळजाभवानी देवी शेजगृहातील पलंगावर विसावली.   देवीजीं मंचकी  निंद्रा विधी परंपरागत स्वरूपात संपन्न झाला.



त्यापुर्वी सेवेकरी पलंगे कुटुंबीयांनी मंचकी निद्रेसाठी पलंग  स्वच्छ धुऊन घेतले, तर आराधी महिलांनी गाद्यांचा कापूस पिंजला, दरम्यान ८ दिवसांची मंचकी निद्रा पुर्ण झाल्यावर म्हणजे येत्या गुरूवार दि.  ७ ऑक्टोबर रोजी  घटस्थापने दिवशी ‍ पहाटे तुळजाभवानी देवी सिंहासनावर विराजमान होणार आहे.श्री तुळजाभवानी देवीच्या नवरात्रास घटस्थापनेने दि. ७ ऑक्टोबर रोजी पासून सुरूवात होत आहे.  बुधवारी रोजी सकाळपासूनच सेवेकरी पलंगे यांनी देवीचा चांदीचा पलंग  स्वच्छ धुऊन घेतला. त्यानंतर पलंगावर नवीन नवार पट्ट्या बांधून घेतल्या.  यावेळी मोजक्याच आराधी महिलांच्या उपस्थितीत गाद्यांचा कापूस पिंजून घेवुन नवीन गाद्या पलंगावर ठेवले. मंचकी निद्रेसाठी पलंग सज्ज ठेवण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत मोजक्याच पुजारी, सेवेकरी आणि मानकऱ्यांच्या उपस्थितीत सर्व विधी परंपरेप्रमाणे पार पडले.


 देवीजीच्या मंचकी निद्रेसाठी गाद्यांचा कापूस पिंजण्याचा मान मुस्लिम समाजाला आहे. शम्मू  पिंजारी यांच्याकडे परंपरागतपणे हा मान चालत आलेला आहे. शम्मू पिंजारी यांनी गाद्यांचा कापूस पिंजला. त्यांना त्यांच्या पत्नीने साहाय्य केले.
 सायंकाळच्या अभिषेकनंतर खंडोबाचे पुजारी वाघे यांनी आणलेला भंडारा देवीच्या मूर्तीला लावून “आई राजा उदो उदो’च्या जयघोषात देवीची मूर्ती सिंहासनावरून हलवून पलंगावर ठेवण्यात आली. तत्पूर्वी गाभाऱ्यात धार्मिक विधी उरकण्यात आले. त्यानंतर पलंगावरच प्रक्षाळ पूजा करण्यात आली.


   देवीजी वर्षभरात तीन वेळा एकूण २१ दिवस मंचकी निद्रा घेते. यामध्ये शारदीय नवरात्रोत्सवापूर्वी ८ दिवस, सीमोल्लंघनानंतर ५ दिवस व शाकंभरी नवरात्रोत्सवापूर्वी ८ दिवस देवी पलंगावर मंचकी निद्रा घेत असते.
देवीची सर्व नित्योपचार पूजा पलंगावर ,
तुळजाभवानी देवीच्या मंचकी निद्रे दरम्यान सकाळच्या चरणतीर्थ पूजेपासून सायंकाळचा प्रक्षाळ पूजेपर्यंत सर्व नित्योपचार पूजा पलंगावर करण्यात येतात. 
 
Top