वागदरी , दि .०७ : एस.के.गायकवाड
शासनाच्या दुर्लक्षेमुळे बोरी नदीवरील मंजूर पुलाचे काम न झाल्याने व बोरी नदीला पूर आल्यामुळे तुळजापूर तालुक्यातील येडोळा गावचा रस्ता बंद झाला आणि नळदुर्ग ते यडोळा गावाचा संपर्क तुटला आहे.
नळदुर्ग, येडोळा, वागदरी व परिसरात (ता.तुळजापूर) पुर्वा नक्षत्रातील पावसाने सरते शेवटी दमदार हजेरी लावल्याने नळदुर्ग येथील बोरी धरण भरून सांडवा वाहू लागला. येथील ऐतिहासिक किल्ल्यातील नर मादी धबधबे सुरु झाले.बोरी नदीवरील उच्चस्तरीय बंधाऱ्याचे दरवाजे खुले करण्यात आले. लोहगाव शिवारातील खंडाळा तलाव भरून मोठ्या प्रमाणात अतिरिक्त पाणी सांडव्याव्द्वारे वाहू लागले. परिणामी बोरी नदीला पुर आला आणि नदीवरील पुलाआभावी येडोळा ते नळदुर्ग ,अक्कलकोट या मुख्य महामार्गाला जोडणारा रस्ता बंद होऊन येडोळा गावचा संपर्क तुटला.
त्यामुळे येथील ग्रामस्थाना दैनंदिन व्यवहाराठीची मोठी आडचण निर्माण झाली आहे. गत वर्षी सरत्या पावसाने रौद्ररुप धारण केल्याने अतिवृष्टी होऊन नदीला महापूर आला होता. या महापूरात नदीकाटच्या गावांचे व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. या महपूरातच येडोळा गाव ते येडोळा पाटी (कंदुरमळा) या रस्ताला जोडणारा के.टी. बंधाऱ्याचा पुल कोसळला. त्यामुळे दैनंदिन व्यवहारा करीता नळदुर्ग येण्या जाण्यासाठीचा मार्ग बंद पडला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शासनाने नदीवर पुल बांधण्याचे मंजूर केले. पण वर्ष होऊन गेले ना पुल बांधकाम झाले, ना बंधारा दुरूस्त झाला त्यामुळे येडोळा ग्रामस्थाना येरे माझ्या मागल्या म्हटल्या प्रमाणे पुन्हा बोरी नदीच्या पूराचा सामना करावा लागत आहे. आता तरी शासनाला जाग येईल का ? या वर्षीतरी पुलाचे काम सुरू होईल का असा संतापजनक प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत.