परंडा, दि . १५ :  शेख फारुक  

एकीने तलवार चालवायला शिकवली तर एकीने लेखनणी, एकीने रक्षण केले तर एकीने शिक्षण दिले.
  जिजाऊ-सावित्री-फतिमा- अहिल्याबाई- रमाई यांच्यात गौरी पहाणे आज काळाची गरज आहे.
          

पारंपरिक गौरीच्या सणाला पूर्णपणे बगल देत राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्री, रमाई, फतिमा शेख, अहिल्याबाई यांच्याच रुपात गौरी पहाणे आज काळाची गरज झाली आहे. त्यामुळे मी यावर्षीपासून ठरवले की गौरी सणाच्या दिवशी सावित्री- जिजाऊंनाच गौरीच्या रुपात घरात आणायचं व त्यांचे विचार प्रत्येक महिलेपर्यंत पोहचण्यासाठी  हळदी कुंकवासाठी येणाऱ्या महिलांना सावित्री-जिजाऊ यांच्या चरित्रावर आधारीत प्रबोधनाची पुस्तके भेट म्हणून द्यायची. आपल्या पारंपारिक सनामधून विविध ज्वलंत समस्यांविषयी सकारात्मक संदेश देऊन महिलांची वैचारीक पातळी उंचवण्याचा उपक्रम या वर्षापासून मी हाती घेतला आहे. 

मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिग्रेडच्या वाचन चळवळीला प्रोत्साहन देणे, या विचाराने प्रेरित होऊन जिजाऊ सावित्रीचा विचार घरोघरी जावा यासाठी पुस्तकांची आरास सजावटीत मांडली. 
आज आपण पहातो आहोत महिलांवरील अत्याचारांच्या मालिकाच सुरू आहेत जर यावर जरब बसवायची असेल तर महिला सक्षम झाली पाहिजे आणि महिला सक्षम करायची असेल तर आपल्याला जिजाऊ-सावित्री-फतिमा- अहिल्याबाई-रमाई यांचे कार्य महिलांच्या डोक्यात उतरवले पाहिजे.


          
म्हणूनच हा अट्टाहास की आपल्या प्रत्येक सणामधील जुन्या अंध रूढी परंपरा हळू हळू बंद करून पुढील येणाऱ्या कठीण काळावर मात करण्यासाठी महिलांनी क्रांतीकारी विचाराचा स्विकार करावा. आजच्या महिलेने काळाची पावले ओळखून चालायला हव नाहीतर पुढील येणारा काळ कठीण असणार आहे. ज्या महिलांची इतिहासाला नोंद घ्यावी लागली अशा महिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून चालावे.  जसे की,
राजमाता जिजाऊ माता ही केवळ मायाळू नसून शक्ती असू शकते याचं सर्वात मोठं उदाहरण जिजाऊ माँसाहेब असू शकतात. राजमाता जिजाऊ यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज घडवले. 


स्वराज्य संकल्पनेची बी मातेनेच आपल्या शिवरायांच्या मनात पेरली. तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचे आहे असा प्रचंड आत्मविश्वास शिवरायांमध्ये निर्माण केला. जिजाऊ खरोखर आदर्श माता आहे. आपल्या मुलांना धैर्य, परोपकार, आत्मविश्वास, शौर्य, न्याय, निर्भय, राष्ट्र प्रेम या सर्वांचे धडे देण्याचे व त्यांच्यात संस्कार देण्याचा सामर्थ्य प्रत्येक आईमध्ये असतं. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले
          

सावित्रीबाई फुले या भारताच्या प्रथम महिला शिक्षीकाच नव्हें तर त्या एक उत्तम कवियित्री, अध्यापिका, समाजसेविका आणि पहिली विद्याग्रहण करणारी महिला देखील आहेत. या व्यतिरीक्त त्यांना महिलांच्या मुक्तिदाता देखील म्हंटल्या जातं. त्यांनी आपले संपुर्ण आयुष्य महिलांना शिक्षीत करण्याकरता आणि त्यांना त्यांचा हक्क मिळवुन देण्याकरता खर्ची घातले.
          

भारतात स्त्री शिक्षणाचा विचार जेव्हा येतो तेव्हा पहिलं मनात नाव येतं ते म्हणजे सावित्रीबाई फुले. आज देशातील सर्व राजकीय पक्ष महिलांच्या शिक्षणाबद्दल वेगवेगळे दावे करीत आहेत, पण त्याचा पाया सावित्रीबाई फुले यांनी 19 व्या शतकातच घातला होता.

अहिल्याबाई होळकर

     अहिल्याबाई होळकर या केवळ एक महान शासकच नव्हे तर पराक्रमी योद्धा आणि सर्वश्रुत अश्या धनुर्धर देखील होत्या. अनेक युद्धांमध्ये साहसी योध्याप्रमाणे विचारपूर्वक निर्णय घेत त्यांनी युद्धाचे नेतृत्व केले आणि विजय संपादन केला. अहिल्याबाईंची ओळख मावळ प्रांताच्या राजमाता म्हणून होती. अहिल्याबाई महिलांच्या सशक्तीकरणाच्या बाजूने होत्या. स्त्रियांची परिस्थिती बदलण्या करता त्यांनी बरेच प्रयत्न केलेत. विधवा स्त्रियांना त्यांचा हक्क मिळण्याकरता अहिल्याबाईंनी कायद्यात बदल करत विधवा महिलांना त्यांच्या पतीच्या संपत्तीत अधिकार मिळवून दिला व मुल दत्तक घेण्याचा हक्क देखील प्राप्त करून दिला.  म्हणूनच करुणेची देवी…कुशल समाजसेविका…या प्रतिमेने त्यांना ओळखलं जात होते . 

रमाई आंबेडकर
    भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची कारकिर्द घडविण्यात रमाईचा सिंहाचा वाटा आहे.  रमाई म्हणजे बाबासाहेबांची सावली. रमाईने आपले जीवन बाबासाहेबांच्या कार्यांप्रती समर्पित केले नसते तर बाबासाहेबांना शून्यातून जग निर्माण करता आले नसते, हे नाकारता येत नाही.
          बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्ययनात व्यत्यय येऊ नये म्हणून त्या राजगृहाच्या प्रवेशद्वारावर तासनतास बसून राहायच्या. बाबासाहेबांना कोणी भेटायला आल्यावार त्यांच्याशी तितक्याच अदबीने वागत, "साहेब पुस्तकाच्या कोंडाळ्यात आहेत, नंतर भेटा." असे म्हणत. आलेल्याची रवानगी करताना त्याचे नाव, गाव, कामाचे स्वरूप, पुन्हा कधी येणार आहात, हे सारे एका नोंदवहीत टिपण्यास सांगत
          बाबासाहेबांच्या जीवनात अत्यंत कठीण काळात रमाईने त्यांना खंबीरपणे साथ दिल्यामुळेच बाबासाहेबांना आपल्या कोट्यवधी अस्पृश्य बांधवांचे जीवन फुलविता आले. 
      फातिमा शेख
 सावित्रीबाईंच्या जोडीने स्त्रीशिक्षणाची ज्योत पुढे नेणाऱ्या म्हणजे फातिमा शेख. फातिमा शेख ह्या पहिल्या मुस्लीम शिक्षिका आहेत.  सावित्रीबाई व जोतिबां फुले यांनी सुरु केलेल्या शाळेत सावित्रीबाई फुले यांच्या सोबत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. सावित्रीच्या सोबतिणी' हे खास नाव यासाठी कारण जसं सावित्रीबाई फुलेंनी महिलांना शिक्षणाची दारं उघडी करून दिली तसंच या सगळ्या स्त्रियांनी भारतातल्या महिलांच्या हक्कांसाठी प्रयत्न केले,लढा दिला. म्हणूनच या महिला, काही सावित्रीबाईंच्या समकालीन तर काही नंतरच्या पण सर्वार्थाने 'सावित्रीच्या सोबतिणी.
         

वरील प्रमाणे स्त्रीचे कर्तुत्व पहाता स्त्रियांनी आपली शक्ती ओळखून उज्ज्वल भविष्य निर्मितीसाठी प्रयत्न करावेत व केलेच पाहिजेत आशी माफक अपेकक्षा जिजाऊ बिग्रेडच्या उस्मानाबाद जिल्हा उपाध्यक्षा आशा गोरख मोरजकर यांनी व्यक्त केली
 
Top