सलगरा , दि .१५
तुळजापूर तालुक्यातील वडगाव (देव) येथील श्री. शिवमित्र गणेश मंडळ यांच्या माध्यमातून गेल्या ७ वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम पार पडत आहेत. वडगाव देव येथील शिवमिञ गणेश मंडळ हे " एक गाव एक गणपती " ही परंपरा जोपासत आहे. दि.१४ सप्टेंबर रोजी शिवमित्र गणेश मंडळ यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत राहून कोरोनाच्या काळात योगदान दिलेल्या व्यक्तीचा "कोरोना - योद्धा " हा पुरस्कार देण्यात आला.
यामध्ये कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून तुळजापूर तालुक्याचे तहसीलदार सौदागर तांदळे , नायब तहसीलदार संदीप जाधव हे उपस्थित होते. तहसीलदार तांदळे यांच्या हस्ते शिवमित्र गणेश मंडळाच्या श्रींची पूजा झाली. नंतर वडगाव देव येथील खंडोबा मंदिर सभागृहात कोरोना योद्धांना पुरस्कार देण्यात आला, यामध्ये रुग्ण कल्याण समिती उपजिल्हा रुग्णालय तुळजापूरचे सदस्य आनंद कंदले, हॅलो मेडिकल फाऊंडेशनचे सामाजिक कार्यकर्ते बसवराज नरे, जलदुत तसेच लोकसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष पंकज शहाणे, पत्रकार राम जळकोटे, पत्रकार प्रतिक भोसले, वडगाव देव येथील आशा कार्यकर्त्या शामल शिंदे, अंगणवाडी शिक्षिका बाई गिरी, अंगणवाडी शिक्षिका विजया बनचेडे, अंगणवाडी सेविका रंजना बंडगर, अंगणवाडी सेविका जनाबाई बोरगावे, वडगाव ग्रामपंचायत सेवक म्हताब शेख, जिल्हा परिषद वडगाव येथील शिक्षक घायाळ आदींना हा कोरोना - योद्धा पुरस्कार देण्यात आला.
यामध्ये पुरस्काराचे मानकरी यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले, कार्यक्रमात तहसीलदार सौदागर तांदळे यांनी गावातील शेतकरी तसेच तरुण वर्गांसोबत संवाद साधला. या वेळी मानकऱ्यांचे कौतुक करत त्यांना कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित करणे व आपण त्यांचा आत्मविश्वास वाढवणे हे आपले कर्तव्य असल्याचे तहसीलदार सौदागर तांदळे यांनी बोलताना सांगितले. विशेष म्हणजे तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्यांना शेतरस्ता करून देण्यास माझे प्रयत्न आहेत, तालुक्यातील प्रत्येक गरजू आणि निराधार व्यक्तींना विविध योजना मिळाव्यात या साठी मी स्वतः लक्ष घालत आहे, येणाऱ्या आगामी काळात वडगाव (देव) येथील शिव गणेश तरुण मंडळाचे सहकार्य आम्हाला लाभणार आहे. शिव गणेश मित्र मंडळाचे कार्य खरंच कौतुकास्पद असून येणाऱ्या काळात सुद्धा त्यांनी हा वसा असाच चालवावा असे सुध्दा तहसीलदार तांदळे यांनी बोलताना म्हटले. तहसीलदार तांदळे यांना सर्वोत्कृष्ट तहसीलदार हा पुरस्कार मिळाल्याने त्यांचा मंडळाचे अध्यक्ष प्रताप पाटील यांनी सत्कार केला,
गावातील प्रत्येक नागरिकांनी लसीकरण करून घेणे गरजेचे असल्याचे रुग्ण हक्क कल्याण समितीचे सदस्य आनंद कंदले यांनी बोलतेवेळी म्हटले, मंडळाच्या प्रत्येक तरुणांनी पुस्तकाशी मैत्री करावी आणि आपल्या करिअर कडे वाटचाल करणे अधिक गरजेचे असल्याचे हॅलोचे बसवराज नरे यांनी म्हटले, तरुणांमध्ये चळवळ महत्वाची असून ही चळवळ पुढील कार्यासाठी उभारी देणारी असल्याचे जलदुत लोकसेवा फाऊंडेशनचे पंकज शहाणे यांनी म्हटले,
या वेळी गावातील आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षा सरपंच पद्मिनी सगट, उपसरपंच उत्तम देवकते, तंटामुक्ती अध्यक्ष बाबासाहेब देवकते, वानेगाव येथील माजी सरपंच उत्तम पाटील, शिव मित्र गणेश मंडळाचे अध्यक्ष प्रताप पाटील, उद्योजक दीपक जाधव, गावातील शेतकरी सुभाष राजमाने यांच्या सह मंडळाचे सर्व सदस्य, पदाधिकारी, गावातील नागरिक, माता भगिनी आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद राजमाने यांनी केले तर आभार प्रदर्शन माजी सरपंच नागेश कालेकर यांनी केले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करत हा कार्यक्रम पार पडला.