उस्मानाबाद ,दि .२९ :
अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून प्रचंड नुकसान झाले आहे. सोयाबीन पाण्यात गेले असून हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. तातडीने नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी. तसेच राष्ट्रीयकृत बँकांकडून पीक कर्जाची जाचक वसुली सुरू असून ती थांबविण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्याकडे शेतकऱ्यांच्या वतीने ग्रामपंचायत सदस्य विनोद बाकले यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा करण्यासाठी पालकमंत्री गडाख हे दाऊतपूर, ईला गावाकडे जात असताना सारोळा गावात बुधवारी (दि.२९) त्यांचा ताफा थांबविण्यात आला. यावेळी पालकमंत्री गडाख यांनी निवेदन स्विकारून शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. ग्रामपंचायत सदस्य बाकले यांनी पालकमंत्र्यांकडे शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई द्यावी. चार दिवसांपासून अतिवृष्टी झाली आहे. सोयाबीनसह खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जनावरांचे गोठे, शेतातील माती, घरांची मोठी पडझड झाली आहे. अतिवृष्टीने पिके वाहून गेली आहेत. त्यामुळे नुकसानीची मदत शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर मदतीचे वितरण करावे. तसेच पीक कर्जाची वसुली थांबविण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी केली. यावेळी पालकमंत्री गडाख यांनी मदत देण्यासह बँंकांच्या पीककर्ज वसुलीला स्थगिती देण्याचे आदेश देण्यात येतील, असे आश्वासन दिले.
यावेळी खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ. कैलास घाडगे-पाटील, दिलीप जावळे, वैभव पाटील, सुधाकर मसे, सुरेश रणदिवे, प्रितम कुदळे, रवि नाडे, नितीन पाटील, राजेश मसे, नामदेव खरे, काका पाटील, महादेव कोळगे, रामेश्वर मिटकरी, बाळासाहेब स्वामी, पंडीत देवकर, सौदागर बाकले, प्रदीप कोल्हे, महेश जाधव आदींसह शेतकरी उपस्थित होते.