नळदुर्ग , दि . २६: विलास येडगे
न्यायालयाच्या आदेशाचे अवमान करून राष्ट्रीय महामार्ग क्र.६५२ नळदुर्ग--अक्कलकोट या रस्त्याचे अनाधिकृतपणे काम करणाऱ्या ठेकेदार व अधिकारी यांच्या निषेधार्थ मंगळवार दि.२६ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य अशोक जगदाळे व शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख कमलाकर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने नळदुर्ग येथे नळदुर्ग--अक्कलकोट रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
राष्ट्रीय महामार्ग क्र.६५२ या रस्त्याच्या संदर्भामध्ये अनेकवेळेस निवेदन देऊन सुद्धा संबंधित ठेकेदार व अधिकारी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा अवमान करत आहेत. नळदुर्ग - अक्कलकोट रस्त्याच्या कामात शेतकऱ्यांवर अन्याय करून तसेच त्यांच्या जमिनीचा मावेजा न देता त्यांच्या जमिनीमधुन ठेकेदार व अधिकारी रस्त्याचे काम करीत असल्याच्या निषेधार्थ शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने हा रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य अशोक जगदाळे व शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख कमलाकर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
या आंदोलनात शेतकरी संघर्ष समितीचे सरदारसिंग ठाकुर,दिलीप जोशी,नगरसेवक नितिन कासार, सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव, मारुती खारवे, दिलीप नानासाहेब पाटील, काशिनाथ काळे, सुभाष मोरे, हुसेन पटेल, संतोष फडतरे, शिवाजी वऱ्हाडे, खंडू हलकंबे, व्यंकट पाटील, चंद्रकांत शिंदे, ज्ञानोबा सुरवसे, लक्ष्मण निकम, निलकंठ पाटील, नरसिंग निकम, शिवराम लोहार, प्रतापसिंग ठाकुर खुशालसिंग ठाकुर, दशरथसिंग ठाकुर, शरण शिरोळे, अरुण काळे, तोलू करीम शेख, गफूर मुल्ला, तुकाराम सुरवसे, बंडू मोरे, महादेव बिराजदार, प्रभाकर बिराजदार, पंडीत पाटील, गुलाब शिंदे, बडेसाहब कुरेशी, अजमोद्दीन शेख, अजीम कुरेशी, धैर्यशील खताळ--पाटील, पंडित महादेव निकम, अजय नाईक व विलास कोरे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना अशोक जगदाळे यांनी म्हटले की, तालुक्याचा लोकप्रतिनिधी चुकीचा निवडला गेल्यामुळे आज शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. तालुक्याच्या लोकप्रतिनिधीला शेतकऱ्यांविषयी कांहीही देणेघेणे नाही. ठेकेदार आणि यांचे लागेबंधे आहेत त्यामुळे संबंधित विभागाचे अधिकारी व ठेकेदार मनमानी करीत न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करीत शेतकऱ्यांना दमदाटी करून अनाधिकृतपणे रस्त्याचे काम करीत आहेत. यापुढे हे खपवुन घेतले जाणार नाही. नळदुर्ग--अक्कलकोट रस्त्याच्या कामात या ठेकेदाराने कुठलीही आडकाठी नसताना नळदुर्ग शहरांतील गोलाई ते बस्थानकापर्यंतचे सर्व्हिस रस्ता, गटार बांधकाम व इतर कामे अर्धवट ठेवले आहेत. अधिकाऱ्यांनी ही अर्धवट कामे पुर्ण करून घ्यावेत. यापुढे ठेकेदार किंवा अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांवर अन्याय केला किंवा शेतकऱ्यांना दमदाटी केली तर त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल.
शेतकऱ्यांनी एकजुटीने राहुन अनाधिकृतपणे काम होत असेल तर ते होऊ देऊ नये. शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहणार असल्याचे अशोक जगदाळे यांनी म्हटले आहे.
यावेळी बोलताना कमलाकर चव्हाण यांनी म्हटले की, शेतकऱ्यांना दमदाटी करण्याचा प्रयत्न कुणी करू नये अन्यथा त्यांना त्याचे परीणाम भोगावे लागतील.शिवसेना या शेतकऱ्यांच्या पाठीशी असुन जोपर्यंत न्यायालयाचा निकाल लागत नाही तोपर्यंत या रस्त्याचे काम करू नये. अन्यथा शेतकऱ्यांना सोबत घेऊन हे काम शिवसेना बंद पाडेल असा इशारा कमलाकर चव्हाण यांनी यावेळी दिला. यावेळी शिवसेनेचे उपतालुकप्रमुख सरदारसिंग ठाकुर शहर शिवसेना प्रमुख संतोष पुदाले,दहिटण्याचे उपसरपंच सोमनाथ गुड्डे, शिवसेनेचे सुनिल कदम, दिलीप जोशी यांचीही यावेळी भाषणे झाली. रास्ता रोको आंदोलनानंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी श्री कदम, मंडळ अधिकारी जयंत गायकवाड यांना निवेदन देण्यात आले. यावेळी नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर मोटे, पोलिस उपनिरीक्षक बजरंग सरपाळे,एम. एम. शहा व जीविषाचे धनंजय वाघमारे, अच्युत पोतदार यांनी आंदोलनस्थळी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला होता.