तुळजापूर,दि.२६ 

 येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे संविधान दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.


यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एम मणेर यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.तसेच संविधान दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय सेवा योजना विभाग व राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रा.डॉ.बालाजी गुंड यांचे भारतीय संविधान व आम्ही या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी डॉ.गुंड यांनी वरील प्रतिपादन केले.आपल्या मार्गदर्शनपर भाषणात ते पुढे म्हणाले की,आज आपण भारतीय स्वतंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असतांनाही देशाची एकता आणि अखंडता कायम आहे याचे श्रेय केवळ भारतीय संविधानालाच जाते.तसेच संविधानाने दिलेल्या स्वतंत्र समता बंधुता व सामाजिक न्याय या मूल्यांमुळे देशातील जनमानसात एकतेची भावना निर्माण झाली.व त्यातुनच  राष्ट्रीय ऐक्य निर्माण झाले.भारतीय संविधान म्हणजे त्यातील शब्द नव्हेत,तर या देशातील व्यक्ती केंद्रस्थानी मानून स्वतंत्र  व समतेची आस धरणारा एक जिवंत दस्तावेज आहे.संविधानाची पायाभूत मुल्ये न्यायपालिकेने जपलिच आहेत पण ती लोकांमध्ये व नागरी समाजामध्ये रुजायलाच हवीत या विषयीचे हे चिंतन आहे.म्हणून भारतातील नागरीकांनी भारतीय संविधानाचा विचार आत्मसात करावा असा अनमोल संदेश त्यांनी यावेळी दिला.


 महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एम मणेर हे म्हणाले की, सकारात्मक राज्यव्यवस्थेसाठी संविधान आवश्यक आहे.संविधान निर्मिती साठी २ वर्ष ११ महिने १८ दिवस एवढ्या प्रदिर्घ काळात अथक परिश्रमातून हे संविधान उदयास आले,व या संविधानामुळेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळाले व स्वातंत्र्याचा उपयोग आज प्रभावीपणे होताना दिसत आहे.परंतु अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सदुपयोग व्हावा व इतरांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत अशीच शिकवण संविधान देते.असे अनमोल मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले.

याप्रसंगी संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन देखील करण्यात आले.कार्यक्रमाप्रसंगी प्रा.धनंजय लोंढे,प्रा.वागदकर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा विवेकानंद चव्हाण यांनी व आभार प्रा.डॉ.नेताजी काळे यांनी मानले.कार्यक्रमासाठी  विद्यार्थी उपस्थित होते.सदर प्रसंगी सर्व उपस्थितांकडुन कोरोना संबंधित सर्व नियमांचे पालन करण्यात आले.
 
Top