नळदुर्ग , दि . १४ :
शहरातील एसबीआय बँकेच्या एटीएम मधुन पैसे काढत असताना तांत्रिक अडचण येत असल्याचे पाहुन एका अनोळखी इसमाने मदत करण्याच्या देखावा करत दोघाना ८७ हजारास गंडवुन फसवणुक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नळदुर्ग पोलिस ठाण्यात शनिवार दि. १३ नोव्हेंबर रोजी संबंधितानी फिर्याद दिल्यावरुन अज्ञात आरोपीविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बिरु दगडु घोडके, रा. नळदुर्ग, ता. तुळजापूर व पांडुरंग शिवमुर्ती भुजबळ हे दोघे दि. 08.11.2021 रोजी 15.00 वा. सु. नळदुर्ग येथील एसबीआय एटीएममध्ये डेबिट कार्डद्वारे पैसे काढत होते. यावेळी त्या दोघांना पैसे काढण्यास अडचण येत असल्याचे पाहून तेथे उपस्थित असलेल्या एका अनोळखी पुरुषाने मदतीचा बहाना करुन त्या दोघांचे डेबिटकार्ड घेउन त्या दोघांना त्यांच्याच डेबिट कार्डच्या रंगसंगतीचे दुसरे डेबिट कार्ड दिले. यानंतर 16.00 वा. सु. बिरु घोडके यांना त्यांच्या बँक खात्यातून 49,888 ₹ रक्कम कपातीचा व पांडुरंग भुजबळ यांना त्यांच्या बँक खात्यातून 37,300 ₹ कपातीचा बँकेचा लघु संदेश प्राप्त झाला. अशा मजकुराच्या बिरु घोडके यांनी दि. 13 नोंव्हेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420 सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम- 66 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.