तुळजापूर ,दि . १७ :  राम जळकोटे

खरिपाच्या शेवटी मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीने पिकाची नासाडी केल्यानंतर रब्बीची पिके तरी चांगली येतील अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र मागील पंधरवड्यापासून होत असलेल्या ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसामुळे तुळजापूर  तालुक्यातील किलजसह परिसरातील रब्बीची पिके धोक्यात आली आहेत.



हरभरा आणि तुरीवर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने ही पिके नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. दरम्यान मागील सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यातील परतीच्या पावसाने खरीप हंगामातील पिकांची पूर्णपणे वाट लावली असताना रब्बीच्या पिकावर ढगाळ वातावरणामुळे विविध रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने पुन्हा एकदा शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. सध्या वातावरणात सतत बदल होत असलेल्या ढगाळ वातावरणामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.आतापर्यंत तुरीचे पीक जोमात आले होते परंतू गेल्या पंधरा दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरण अधूनमधून पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे तुरीच्या फुलांना गळती लागली आहे.हरभरा पिकाला मर रोगाची लागण झाली असून कितीही महागडी औषधी फवारणी केली. तरी हा रोग जात नाही.फुल गळती आणि रोगापासून तुरीचे व हरभऱ्याचे संरक्षण व्हावे यासाठी कृषी विभागाने तत्काळ मार्गदर्शन करण्याची गरज आहे.


सध्या बदलत्या वातावरणामुळे पिकावरील रोगराईचे प्रमाण वाढले आहे.त्यामुळे जिल्हा कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कर्मचारी गावपातळीवर बांधावर वाचविण्यासाठी मार्गदर्शन करतील का असा प्रश्न शेतकरी वर्गातून उपस्थित केला जात आहे.


प्रतिक्रिया :- 
 सध्या वातावरणात झालेल्या बदलामुळे आम्हा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहेत.यामध्ये माझ्या शेतात हरभरा पिकाला मर आली आहे.त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक खर्च करावा लागत आहे.याविषयी आम्हा शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी गावपातळीवर मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.
-उमाकांत पाटील, शेतकरी.

माझ्या शेतातील हरभरा पिकाला सध्या अळ्या लागल्या आहेत.त्यामुळे हरभरा पिकाला मर लागली आहे.पीक हातातून जाण्याच्या मार्गावर आहे.त्यासाठी औषधे फवारणीचा मोठा खर्च असून आम्हा शेतकऱ्यांसमोर मोठं संकट आहे.
-ज्ञानदेव देवकते,शेतकरी.
 
Top