नळदुर्ग ,दि. १७ :
गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्र राज्यातील एस.टी.मधील कर्मचाऱ्यांचा विविध (वेतन आयोग,विलीनीकरण) मागण्यांसाठी बेमुदत संप चालू असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होताना दिसत आहे.
तुळजापूर तालुक्यातील तुळजापूर,अणदूर,जळकोट, नळदुर्ग,तामलवाडी अशा महामार्गावरील असणाऱ्या माध्यमिक व उच्च माध्यमिक,महाविद्यालयात शिक्षण घेणारे विद्यार्थी मुले-मुली शिक्षणापासून वंचित राहत आहेत.गेल्या काही दिवसांत प्रथम सत्र परीक्षा संपन्न झाल्या,त्यावेळी नाविलाजास्तव जीव मुठीत घेऊन टमटम,जीप,ट्रक या वाहनांनी प्रवास करून विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्या. इयत्ता 10 वी,इ.12 वी च्या परीक्षाची तारीख सुद्धा जाहीर झालीआहे. परंतु विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या तासांना बस बंद असल्याने उपस्थित राहता येत नाही.एस.टी.बंद असल्याने शैक्षणिक नुकसान होताना दिसत आहेत.
याबरोबरच महाविद्यालयीन,व्यावसायिक शिक्षण ही पूर्ण बंद झालेले दिसत आहे.कोरोनानंतर शाळा चालू झाल्या मात्रएस.टी.बंद झाल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे.परिसरातील विद्यार्थी हे सोलापूर व उस्मानाबाद यांसारख्या शहरात उच्च शिक्षण घेण्यासाठी जातात.
एस.टी.कर्मचा-यांच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार मा.मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे,परिवहन मंत्री ना.श्री.अनिल परब यांनी चर्चेतुन मार्ग काढून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे,ही अपेक्षा पालक,शिक्षक,विद्यार्थी यांच्याकडून व्यक्त होताना दिसत आहे.यासाठी एस.टी. प्रशासनाने तात्काळ मार्ग काढावा व पुढील विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळावे अशी मागणी जवाहर विद्यालय,अणदूर येथील विद्यार्थी परिवहन समिती प्रमुख कैलास बोंगरगे यांच्यासह सदस्य सिध्देश्वर मसुते यांनी केली आहे.