नळदुर्ग , दि . १५ :
७ वे बौद्ध साहित्य संमेलन ऐतिहासिक नळदुर्ग (जि.उस्मानाबाद) शहरात होणार असल्याची माहिती बौद्ध साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे यांनी दिली आहे.
बौद्ध साहित्य संमेलनाच्या आयोजनाबाबत रविवार,दिनांक १२ डिसेंबर रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.अंबाजोगाईत बौध्द साहित्य परिषदेच्या वतीने दरवर्षी बौद्ध साहित्य संमेलन घेतले जाते.आत्तापर्यंत सहा संमेलने झाली असून महाराष्ट्रातील नामवंत विचारवंत व सुप्रसिद्ध लेखक हे संमेलनाध्यक्ष राहिले आहेत.डॉ.आ.ह.साळुंखे, डॉ.यशवंत मनोहर, उत्तम कांबळे, डॉ.प्रदीप आगलावे, योगिराज वाघमारे आणि दत्ता भगत यांनी अध्यक्षपद भूषविले आहे.
बौद्ध हा शब्द केवळ धार्मिक नसून तो साहित्याच्या अनुषंगाने वापरला जातो बौद्ध साहित्य,पाली साहित्य हा शब्द जागतिक पातळीवर रूढ झाला आहे.तथागत भगवान बुद्धांनी आपल्या अनुयायांना तत्कालीन लोकभाषेत जो उपदेश केला तो त्रिपिटक या ग्रंथात एकत्रित करण्यात आला आहे.पाली, संस्कृत,इंग्रजी,हिंदी,सिंहली,चिनी आदी भाषेत हा ग्रंथ उपलब्ध आहे. बौद्ध साहित्याचा प्रभाव जागतिक वाड्मयावर असून भारतीय साहित्य आणि संस्कृतीवर तो ठळकपणे जाणवतो. या साहित्य संमेलनात बौद्ध साहित्य,संस्कृती आणि तत्वज्ञानावर चर्चा केली जाते. जानेवारी- २०२२ मध्ये हे संमेलन होणार असून लवकरच संमेलनाध्यक्षांची निवड केली जाईल असेही डॉ. कांबळे यांनी दिली.या बैठकीस परिवर्तन सामाजिक संस्थेचे संस्थापक मारूती बनसोडे उपस्थित होते.
नळदुर्ग येथे होणार्या बौद्ध साहित्य संमेलनाची संयोजन समिती पुढील प्रमाणे आहे. मारुती बनसोडे ,भैरवनाथ कानडे ,एस. के.गायकवाड , अरुण लोखंडे , उमेश गायकवाड , शरद बागडे, सचिन कांबळे ,चंद्रकांत शिंदे , शाम नागिले , सुरेश लोंढे आदींचा समावेश असून नळदुर्ग या ऐतिहासिक शहरात हे साहित्य संमेलन ऐतिहासिकच होणार असा विश्वास संयोग समितीने व्यक्त केलाआहे.