किलज, दि . २५
तुळजापूर तालुक्यातील जवळगा (मे) शिवारात त्याचबरोबर सलगरा(दि) वडगाव देव,या गावांच्या परिसरात रान डुकरांनी पिकांचे नुकसान केले आहे. त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत.
रानडुकरांचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा,अशी मागणी शेतकऱ्यांतून प्रशासनाकडे होत आहे.
जवळगा (मे) येथील शेतकरी मागील अनेक दिवसांपासून रान डुकरांच्या त्रासामुळे हैराण झाले आहेत.कधी अवर्षण तर कधी अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे.तरीही नाईलाजास्तव बहुतांश शेतकरी शेती करतात. मागील वर्षी झालेले नुकसान पुढील वर्षी भरून निघेल या आशेवर शेतकरी उत्साहात पेरणी करतात.
परंतु,जवळगा(मे) येथील शेतकऱ्यांना सध्या मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे.जवळगा, वडगाव देव,सलगरा(दि) शिवारात मागील काही दिवसांपासून रानडुकरांनी हैदोस घातला आहे. रानडुकरांकडून शेतातील पिकांचे नुकसान केले जात आहे.मागील काही दिवसांपूर्वी या रानडुकरांनी हरभरा,ज्वारी,पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले.यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला.
तसेच सध्या शेतात ज्वारीचे पीक आहे.याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.रात्रीच्या वेळी हे रानडुकर शेतात येतात आणि पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात.यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत.परंतु, रात्रीच्या वेळी अंधारात कसा बंदोबस्त करायचा असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.कारण रानडुकर आपल्या अंगावर आले तर काय हा भीतीपोटी प्रश्न सर्वांना पडत आहे.त्यामुळे शेतात रानडुकर आले की बॅटरीने लाईट दाखवून भीती दाखवणे, मोठा आवाज करणे असे अनेक प्रकार शेतकऱ्यांकडून केले जात आहेत. तरीही म्हणावा तसा फरक दिसून येत नाही.ज्वारी बरोबर ऊस पिकाचेही नुकसान होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे जवळगा येथील शेतकरी हैराण झाले आहेत.या रानडुकरांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी अनेक शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
आमच्या शेतात आम्ही हरभरा पिकाची पेरणी केली आहे तसेच ऊस सुद्धा आहे.मात्र मागील काही दिवसांपासून आमच्या शेतात रात्री रान डुक्करांचा हैदास सुरू आहे.याबद्दल प्रशासनाने तात्काळ काही तरी करावे.
-धोंडीबा कालेकर,वडगाव देव शेतकरी.
आमच्या शेतात मागील १५ दिवसापासून रान डुक्कर हे मोठ्या प्रमाणात शेतातील पिकाचे नुकसान करत आहेत.यामुळे भरपुर शेतीचे नुकसान होत आहे.याचा काही तरी बंदोबस्त करणे गरजेचे आहे.
-नवनाथ वाघ.जवळगा (मे),शेतकरी.