उस्मानाबाद ,दि . १२
हर घर दस्तक मोहिमे अंतर्गत घरोघरी लसीकरण मोहीम राबवली जात आहे. जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी दक्ष राहून लसीकरण उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील रहावे असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे यांनी केले.
उस्मानाबाद जिल्हा परिषदेत राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी झालेल्या कार्यक्रमात कांबळे बोलत होत्या.
यशवंतराव चव्हाण सभागृह मध्ये राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस अध्यक्षा कांबळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ, माध्यमिक शिक्षणाधिकारी गजानन सुसर, माध्यमिक शिक्षण विभागाचे सहाय्यक प्रशासन अधिकारी पी.वाय.जाधव यावेळी उपस्थित होते.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबवली जात आहे. मात्र जिल्ह्यातील 1 लाख व्यक्तींनी कोरोणा प्रतिबंधक लसीचा एकही डोस घेतलेला नाही हे निदर्शनास आलेले आहे. जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांची उपस्थिती पन्नास टक्के करण्यात आले आहे. प्रत्येकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी मात्र आपल्या आजूबाजूला जो कोणी लसीकरणापासून वंचित आहे त्यांनाही लस घेण्याकरिता प्रवृत्त करावे असे आवाहन कांबळे यांनी केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सुत्रसंचलन कारभारी यांनी केले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि तिसरी लाट लक्षात घेता या कार्यक्रमाला मोजक्या स्वरूपात कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते.