जळकोट, दि.२९ : मेघराज किलजे
येथून जवळच असलेल्या नंदगाव ता. तुळजापूर येथे मध्यरात्रीच्या सुमारास गावात अज्ञात चोरट्यानी धुमाकूळ घालत मंदिर व मठात देवीच्या अंगावरील दागिने चोरून , गावातील विविध भागातील चार घरे फोडून जवळपास ४५ हजाराचा ऐवज लंपास केल्याची घटना शनिवार दि.२९ जानेवारी रोजी पहाटे दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत घटनास्थाळावरुन मिळालेली माहिती अशी की, नंदगाव (ता.तुळजापूर) येथील ग्रामस्थ शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास झोपेत असताना गावच्या ग्रामपंचायत समोर असलेल्या बसवेश्वर मंदिराचा दरवाजा कटरच्या साह्याने उचकटून मंदिरात असलेल्या देवीच्या गळ्यातील मंगळसूत्र व नथ त्याचबरोबर दानपेटीतील २५ हजार रुपयावर डल्ला मारल्यानंतर बसवेश्वर मंदिराच्या बाजूस असलेल्या विरक्त मठात प्रवेश करून दोन चादरी घेऊन स्वामीनाथ स्वामी यांच्या घरात प्रवेश करून घरातील ८ हजार रुपये किमतीचे भांडे घेऊन बाहेर पडले. त्यानंतर अविनाश कुलकर्णी यांच्या घरातील पेट्या खाली -वर करून पेटीतील सामान लंपास केले. या पेट्यामध्ये महत्त्वाची कागदपत्रे होती. गावातील तलावाच्या काठावर असलेल्या रत्नाबाई विटकर यांच्या घरात प्रवेश करून चोरट्यांनी रोख दोन हजार रुपये व पितळी सामान लंपास केले.शांताबाई बनपट्टी यांचे घर फोडून चोरट्यांनी नुकसान केले. दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास अर्ध्या तासामध्ये जवळपास पाच ते सहा अज्ञात चोरटे एकत्र येऊन हा धुमाकूळ घातला. व जवळपास ४५ हजाराचा ऐवज लुटल्याचे उघडकीस आले आहे.
ग्रामसुरक्षा दलाच्या एकाचवेळी अनेकांचे भ्रमणध्वनी खनखनल्याने संपूर्ण गाव जागे झाले. परंतु तोपर्यंत चोरटे चोरी करून पसार झाले होते. नंदगाव गावातील सामाजिक कार्यकर्ते वैभव पाटील यांनी अंबुलन्सद्वारे लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले.
या घटनेचा पंचनामा नळदुर्ग पोलीस स्टेशनचे शिंदे, पवार व कोळी यांनी केले. एकाच रात्री गावातील मठ ,मंदिर व घरे फोडल्याने नंदगाव व परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.