काटी , दि . २८
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून दि . २६ जानेवारी रोजी तुळजापूर तालुक्यातील देवसिंगा (नळ ) ग्रामस्थांनी यापूर्वी कुठल्याही गावाने आयोजित न केलेला कार्यक्रम आयोजित करून उस्मानाबाद जिल्ह्यात नवीन पायंडा पाडला आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त देवसिंगा नळ येथील स्वातंत्र्य सैनिक माजी सरपंच आप्पासाहेब पाटील व परीसरातील 25 पेक्षा अधिक स्वातंत्र्य सैनिक व 75 पेक्षा अधिक नव्वदीपार ज्येष्ठ नागरिक यांचा सन्मान सोहळा भव्यदिव्य कार्यक्रम आयोजित करून माजी मंत्री तथा कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, पुष्पहार, प्रशस्तीपत्र व घड्याळ देऊन सत्कार करुन सन्मानित करण्यात आले.
यावेळी बोलताना माजी मंत्री मधुकरराव चव्हाण म्हणाले की, गेल्या तीन ते चार दशकापासून मी तालुक्यात, जिल्ह्यात व महाराष्ट्रातील कुठल्याही गावात अशा प्रकारचा कार्यक्रम पाहिला नसल्याचे सांगून यापुढील पिढीला स्वातंत्र्य सैनिकांचा सहवास लाभणार नसून हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल व मला बोलवून माझ्या हस्ते सन्मान केल्याबद्दल आयोजकांचे आभार मानून हि संकल्पना ग्रामीण भागातील एवढ्या लहानशा खेड्यात राबविल्याबद्दल आयोजकांचे कौतुक केले.
यावेळी अनेक उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून या सिमावर्ती लहानशा देवसिंगा (नळ ) गावचे विशेष कौतुक करून असेच समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात यावेत व यांचा आदर्श परिसरातील इतर गावांनी घ्यावा असे आवाहन केले.
या कार्यक्रम सोहळ्यात 60 पेक्षा अधिक देशप्रेमी बहाद्दर रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तसंकलनासाठी मेडिकेयर ब्लड बँक सोलापूर यांच्या संपूर्ण स्टाफने परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सभापती दीपक आलूरे तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धुरगुडे, वसंत वडगावे, कल्याणराव पाटील,भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष नितीन काळे, सरपंच भगवंत पाटील, युवराज पाटील, भीमाशंकर जमादार, अणदुरचे सरपंच रामचंद्र आलूरे, मुस्तीचे सरपंच नागराज पाटील,सराटीचे पिंटू मुळे, इटकळ ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष दिनेश सलगरे, पत्रकार चांदसाहेब शेख, शिवसेना युवा नेते विरेश डोंगरे, उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामसेवक इब्राहिम शेख यांनी तर सूत्रसंचालन अशोक कस्तुरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरपंच भगवंत पाटील, युवराज पाटील,मल्लिनाथ बिराजदार, धनराज पाटील, माजी उपसरपंच हज्जू शेख,आशपक शेख, उस्मान शेख, मल्लिकार्जुन बिराजदार, शिराज शेख, तुळशीराम घोडके,लोभा राठोड, अझर शेख, महेबूब शेख यांच्यासह देवसिंगा नळ ग्रामस्थ व भीमाशंकर पाटील प्रतिष्ठानच्या युवकांनी परिश्रम घेतले.