लोहारा , दि .  २८                           

  प्रा. शामराव रघुनाथ चव्हाण स्मृती वाचनालयाच्या वतीने दि. १५ ते ३१ जानेवारी दरम्यान "वाचन संस्कृती जागरण पंधरवडा" साजरा केला जात आहे. त्याअंतर्गत दि. २७ बेट जवळगा (ता. उमरगा) येथे गावभर ग्रंथदिंडी वाजत-गाजत काढण्यात आली. 


या ग्रंथदिडीचे उद्घाटन सरपंच लक्ष्मी झाकडे यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रंथदिंडीच्या माध्यमातून वाचन संस्कृती रुजवण्यासाठी जागृती निर्माण करण्यात आली. ग्रंथदिंडीसोबत उमेद कृषी व्यवस्थापक किशोरभाऊ औरादे, उपसरपंच सचिन वाडीकर, पोलिस पाटील युवराज गायकवाड, शालेय समिती अध्यक्ष संभाजी बिराजदार, ग्राम पंचायत सदस्य किरण शिंदे, माजी उपसरपंच बालाजी गायकवाड, शिक्षणप्रेनी प्रताप शिंदे, धानय्या स्वामी, अलका गुरव, प्रतिभा शिंदे, वंदना पाटील आदी मान्यवर होते. 


ग्रंथदिंडीला विश्राम दिल्यानंतर  मार्गदर्शनाच्या कार्यक्रमाला महात्मा बसवेश्वर व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करुन सुरुवात करण्यात आली. किशोरभाऊ औरादे यांनी उपस्थितांना 'वाचनाचे महत्व' या विषयावर मार्गदर्शन केले व वाचनालयाच्या माध्यमातून राबवलेल्या व भविष्यात राबवावयाच्या उपक्रमांची तपशीलवार माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एस. बी. कवाळे यांनी केले. तर आभार डि. बी. जाधव यांनी मानले. ग्रंथदिंडीमूळे गावात चैतन्याचे वातावरण पसरून वाचन संस्कृतीकडे गावकऱ्यांचे लक्ष वेधण्यास मदत झाल्याची प्रतिक्रिया गावकऱ्यांमधून येत आहे. पंधरवड्यातील पुढील कार्यक्रम कसगी, सालेगाव, आनंदनगर आणि कानेगाव याठिकाणी होणार आहेत.
 
Top