उस्मानाबाद , दि . १२
लोहारा नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या सौ.वैशाली अभिमान खराडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. दि. १४ फेब्रुवारी रोजी नगराध्यक्ष पदाची निवड होणार आहे. केवळ औपचारिकता बाकी आहे. शहरात शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात फटाक्याची आतषबाजी करत जल्लोष केला.
लोहारा नगरपंचायतच्या नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आघाडीच्या वतीने शिवसेनेच्या वैशाली अभिमान खराडे यांनी तर काँग्रेस कडून प्रशांत काळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. शुक्रवारी दि.११फेब्रुवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसचे प्रशांत काळे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने नगराध्यक्षपदी वैशाली खराडे यांची बिनविरोध निवड होण्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. केवळ सोमवारी (दि.१४) निवडीची अधिकृत घोषणा होणे बाकी आहे. काँग्रेस उमेदवाराने अर्ज मागे घेतल्याचे समजताच शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी लोहारा शहरातील सर्व प्रमुख चौकात फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला.
लोहारा नगरपंचायतच्या नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार मंगळवारी (दि.८) नगराध्यक्षपदासाठी नामनिर्देशित पत्र दाखल करण्याचा शेवटच्या दिवशी शिवसेनेकडून वैशाली खराडे यांनी २ अर्ज तर काँग्रेसचे प्रशांत काळे यांनी १ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील, जिल्हा बँकेचे माजी चेअरमन बापूराव पाटील, विरोधी पक्ष नेते शरण पाटील, यांच्या आदेशानुसार काँग्रेसचे नगरसेवक प्रशांत काळे यांनी आपला नगराध्यक्ष पदासाठीचा दाखल केलेला अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे नगराध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आघाडी करून तर काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत शिवसेना ९, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी २ अशा एकूण १७ पैकी ११ जागेवर विजय मिळवत लोहारा नगरपंचायत वर शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आघाडीचा झेंडा फडकला आहे. तर काँग्रेसला केवळ ४ जागांवर समाधान मानावे लागले आहे. या निवडणुकीत २ अपक्ष उमेदवारांनीही विजय मिळवला आहे. नगराध्यक्ष निवडीसाठी सोमवारी (दि.१४) लोहारा नगर पंचायत कार्यालयात आयोजित केल्या जाणाऱ्या विशेष सभेत नगराध्यक्षपदी वैशाली खराडे यांची बिनविरोध निवड झाल्याचे अधिकृतरित्या जाहीर केले जाईल.