काटी , दि . २७ : उमाजी गायकवाड

 हुशार; परंतु गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी, अपघातात मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला मदत, कोरोना काळात गरजु कुटुंबांना किराणा साहित्याची मदत करून स्वावलंबी करणाऱ्या तुळजापूर तालुक्यातील शिक्षण क्षेत्रातील मंगरुळ बीटच्या पुढाकाराने सातत्याने मदत करुन ऋणानुबंध जपण्याची परंपरा कायम जपली आहे. कर्तव्याची जाण असलेल्या या मंगरुळ बीटने उस्मानाबाद तालुक्यातील मौजे नितळी येथील कु. अंकिता बालाजी कुंभार हिने अतिशय प्रतिकूल परिस्थितीत उस्मानाबाद येथील भोसले हायस्कूल मधून कोणत्याही खासगी शिकवणी क्लासमध्ये ट्युशन न लावता तिचा सेमी गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज मध्ये प्रवेश मिळवला. 


परंतु वडिलांच्या अकाली निधनामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या कुंभार कुटुंबात कमावती व्यक्ती कोणीच नसल्याने तिचे पुढील मेडिकलच्या शिक्षणावर आर्थिक अडचणीमुळे प्रश्न चिन्ह उभे राहिले होते. हि गोष्ट मंगरुळ बीटचे सतर्क विस्तार अधिकारी मल्हारी माने यांच्या लक्षात आली.सामाजिक बांधिलकीची जाणीव व मुख्य दुवा असलेल्या मंगरुळ बीटच्या व्हाट्सअप गृपच्या माध्यमातून त्यांनी बीटमधील आपले सहकारी शिक्षक मित्र, संबंधित दानशूर व्यक्ती यांचेकडे मदतीचे आवाहन केले. 


या आवाहनाला बीटमधील शिक्षकांनी सकारात्मक प्रतिसाद देत मदत निधी जमा करून कु.अंकिता, तिची आई सरस्वती बालाजी कुंभार यांचेकडे पुढील मेडिकलच्या शिक्षणासाठी विस्तार अधिकारी मल्हारी माने, नांदुरी केंद्राचे केंद्र प्रमुख संजय वाले, येवती केंद्राचे केंद्र प्रमुख विठ्ठल गायकवाड, मुख्याध्यापिका नागर सोनार, सहशिक्षिका श्रीमती दिपा जाधव, श्रीमती आदटराव, श्रीमती वर्षा कोल्हाळे, सहशिक्षक भोयटे, साखरे, क्षिरसागर, बागवान,वाघमाडे, पाटील यांच्या हस्ते 76 हजार 300 रुपयेंचा सुपर्द केला.
   

 मंगरुळ बीटमधील शाळेच्या माध्यमातून विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत असून आर्थिक मदतही केली जात आहे. आतापर्यंत कंत्राटी कर्मचारी सचिन पडवळ यांचे अकाली निधन झाल्याने त्याच्या कुटुंबीयांना 115000/- एक लाख पंधरा हजार रुपये मदतनिधी दिला, एप्रिल 2020 मध्ये लॉक डाउन कालावधीमध्ये बीट मधील 116 गरजू कुटुंबांना प्रत्येकी पाचशे रुपयाचे किराणा साहित्याच्या किटचे वाटप करण्यात आले, जून 2020 पूर्वी बीटमध्ये कार्यरत असलेल्या व नंतर बीट मधून बदली होऊन गेलेल्या शिक्षिका श्रीमती शशिकला कोळी यांचे अपघाती निधन झाल्याने त्यांच्या मुलांना 46000 रुपये निधी जमा करून दिला, 
जून 2021 मध्ये बीट मधील माध्यमिक विद्यालय चिवरी या शाळेतील उपक्रमशील शिक्षक  चंद्रकांत कांबळे यांचे कोरोनामुळे अकाली निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांना 3,54000/- तीन लाख 54 हजार रुपयांचा धनादेश दिला.
     

विस्तार अधिकारी मल्हारी माने यांच्या पुढाकाराने कर्तव्याच्या जाणिवेतून स्वयंप्रेरणेने बीटमधील सहकारी शिक्षकांच्या मदतीने  दर महिना ठराविक रक्कम जमा करून आर्थिक परिस्थितीमुळे त्यांची शैक्षणिक संधी वाया जाऊ नये ही सामाजिक जबाबदारी व कर्तव्याची जाणीव ठेवून ऋणानुबंध जपण्याची परंपरा कायम जपली आहे. या सामाजिक उपक्रमाबद्दल मंगरुळ बीटचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.


हुशार व गरीब विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करून शिक्षण घेतात. केवळ आर्थिक परिस्थितीमुळे त्यांची शैक्षणिक संधी वाया जाऊ नये, या जबाबदारीने, कर्तव्याची जाणीव ठेवून आम्ही हा उपक्रम हाती घेतला. यात दानशूर व्यक्तींचा सहभाग वाढल्यास आम्हाला जास्त मुलांना मदत करता येईल.‘यापुढे आम्ही बीट मधील संत गाडगेबाबा आश्रम शाळेतील अभिजित बागल यांचे अपघाती निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांना मदत करणार आहोत...
  - विस्तार अधिकारी 
    मल्हारी माने, 
मंगरुळ बीट, ता. तुळजापूर
 
Top