मुरुम, ता. उमरगा, दि. २३ :
येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने जलसंवर्धन दिन मंगळवारी रोजी साजरा करण्यात आला.
याप्रसंगी महाविद्यालयातील राज्यशास्त्र संशोधन केंद्राचे समन्वयक प्रा. डॉ. महेश मोटे यांनी जलसंवर्धन व युवक या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करताना म्हणाले की, दि.
२२ मार्च हा प्रतिवर्षी जागतिक जलसंवर्धन दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. याचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे पिण्यास योग्य असलेल्या ताज्या, स्वच्छ पाण्याचे महत्त्व प्रत्येकास समजावे. २२ मार्च हा जागतिक जलसंवर्धन दिन असावा. हा ठराव डिंसेबर १९९२ च्या संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरणविषयक परिषदेत ‘ रिओ द जानेरो ’ या शहरात मांडला गेला, नंतर युनोच्या अधिवेशनात तो सर्व संमतीने मान्य करण्यात आला आणि १९९३ पासून अमलातसुद्धा आला.
आपल्या पृथ्वीवर ९७ टक्के पाणी महासागरात साठलेले आहे. उरलेले तीन टक्के पाणी ताज्या रूपात असते. त्यातील २ टक्के बर्फाच्या रूपात आहे आणि उरलेले १ टक्का पाणी भूगर्भात, ओल्या जमिनीत, वाहत्या नद्या, तलाव, विहिरी, धरणे यामध्ये उपलब्ध असते आणि यावरच आपले सर्व जीवन अवलंबून आहे. या ताज्या पाण्याचा सन्मान करावा, त्याचे प्रदूषण करू नये, प्रत्येक थेंब जपून वापरावा, पाण्याचा अपव्यय टाळावा. हे समजून घेणे, त्याचे समाजाच्या सर्व पातळीवर योग्य प्रबोधन आणि शिक्षण देणे, स्वच्छ पाण्याचे संवर्धन आणि संरक्षण कसे आवश्यक आहे. यासाठी हा दिन साजरा केला जातो. प्रतिवर्षी २२ मार्चला त्या वर्षांचे पाण्याच्या संबंधामधील घोषवाक्य संयुक्त राष्ट्रातर्फे जाहीर होते. २०२० मधील घोषवाक्य होते. ‘‘ पाणी आणि वातावरण बदल ’’ तर २०२१ ला ‘‘ स्वच्छ पाण्याची किंमत ’’ या घोषवाक्यावर जगभरामध्ये काम झाले. यावर्षी जागतिक पाणी दिवसाचे घोषवाक्य आहे.
‘‘ भूगर्भामधील पाणी : अदृश्य ते दृश्य. ’’ भूगर्भात हजारो वर्षांपासून साठलेले पाणी अतिशय मौल्यवान आहे, पण याच पाण्याचा अनावश्यक उपसा करून आपण त्यास कवडीमोल करत आहोत. एवढेच नव्हे तर भविष्यामधील पिण्याच्या पाण्याकरिता संकटास सामोरे जात आहोत. यावर्षी भूगर्भामधील पाण्याबद्दल जास्त जागृती या जागतिक पाणी दिवसापासून जगभर होणार आहे. भूगर्भातील पाणी अदृश्य आहे पण त्याचे परिणाम आपणास सर्वत्र दृश्य स्वरूपात पाहावयास मिळतात. वातावरण बदलाचे परिणाम जसजसे गंभीर होतील. त्या प्रमाणात भूगर्भामधील पाण्याची परिस्थितीसुद्धा चिंताजनक होईल, म्हणून तर त्यास जपण्यासाठी आपण सर्वानी एकत्र येणे गरजेचे आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. अशोक सपाटे होते.
यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. रवि आळ॑गे, डॉ आप्पासाहेब सुर्यवंशी, प्रा. डॉ. संध्या डांगे, प्रा. दिनकर बिराजदार, डॉ. अरविंद बिराजदार, डॉ. रविंद्र गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रवी आळंगे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुभाष हुलपल्ले तर आभार प्रा. मुकुंद धुळेकर यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.