पोलिस आधिका-यावर प्राणघातक हल्ला झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. दरम्यान पोलिस आधिका-याने दिलेल्या तक्रारीवरुन याप्रकरणी नळदुर्ग पोलिस ठाण्यात तिघा भावाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सपोनि सुधीर मोटे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. २२ मार्च रोजी बंदोबस्त करीत असताना दुपारी ४ ते ५ वाजण्याच्या सुमारास शहरातील भवानी चौकात मोटार सायकल वाहनावर मोटार वाहन कायद्यानुसार केसेस करीत असताना नळदुर्ग येथील संदीप संजय राठोड हा मोटार सायकल क्र. एम. एच.१३ सी. वाय.२८५३ वर आला तेंव्हा त्याच्या वाहनावर कारवाई करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर मोटे व पोलीस कर्मचारी रुपेश पाटील हे पेट्रोलिंग करीत मुख्य रस्त्यावरुन बसस्थानकाकडे जात असताना मदन मोबाईल शॉपीसमोर रोडवर पप्पु पाटील यांच्या सोबत बोलत थाबले असताना त्याठिकाणी सुशिल संजय राठोड, संदीप संजय राठोड व रोहीत संजय राठोड हे तिघे येवुन यावेळी संदीप राठोड याने तु माझ्यावर कारवाई का केली असे म्हणुन वाद घालण्यास सुरुवात केली. सुशिल हा शिवीगाळ करून तुला जिवंत ठेवणार नाही असे बोलुन हातात दगड घेऊन अंगावर मारण्यासाठी आला. त्यावेळी पप्पु पाटील व इतरांनी सुशिल याला बाजुला केले. त्याचवेळी रोहीत याने हाताने माझ्या डोक्यात मारले. माझ्या डोक्यात मार लागल्याने मी खाली बसलो असता सुशिल राठोड हा हातात तलवार घेऊन आणि तुला कापतोच असे बोलुन जीवे मारण्याच्या उद्देशाने अंगावर धाऊन आला.
त्यावेळी पोलीस कर्मचारी रुपेश पाटील यांनी त्यास पकडले. त्यावेळी सुशिल याने पाटील यांच्या पोटात जोरदार हाताच्या कोपऱ्याने मारून तिथुन गेला. यानंतर पोलिस उपनिरीक्षक बजरंग सरपाळे, अच्युत पोतदार, शिवाजी राठोड व होमगार्ड संदीप राठोड, विनोद राठोड तेथे आले व त्यांनी मला व रुपेश पाटील यांना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले.सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर भाऊसाहेब मोटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सुशिल संजय राठोड, संदीप संजय राठोड व रोहीत संजय राठोड यांच्याविरुद्ध कलम ३०७,३५३,३३२,५०४ व ३४ भादविसह कलम ४,२५ आर्म ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे हे करीत आहेत.