काटी ,दि . १९

गेल्या सतरा महिन्यांपासून थकलेला पगार तातडीने मिळावा, या मागणीसाठी तुळजापूर तालुक्यातील काटी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सोमवार (18 एप्रिल) रोजी येथील ग्रामपंचायत कार्यालयात समोर कामबंद आंदोलन केले. 

मागील आठवड्यात येत्या आठवडाभरात पगार दिला जाईल, असे आश्वासन ग्रामपंचायतच्या वतीने देण्यात आले होते. परंतु आठवडा उलटून गेला तरी अद्याप पर्यंत ग्रामपंचायत पगारी देण्यासंदर्भात कुठलाही निर्णय घेतला गेला नाही. त्यामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली असून  येथील ग्रामपंचायत कार्यालया समोर त्यांनी कामबंद आंदोलन सुरू‌ केले आहे.

 या आंदोलनास येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक जाधव यांच्यासह नागरिकांनी पाठींबा दर्शविला आहे.
    

 या आंदोलनात अनिल बनसोडे, विलास सपकाळ, व श्रीमती पोपटबाई बोराडे या कर्मचाऱ्यांनी आपल्या कुटुंबासह सहभागी नोंदवला होता.यापूर्वी अनेकदा निवेदनाद्वारे पगारी विषयक मागणी करण्यात आली होती. परंतु अद्याप पर्यंत कुठलाही ठोस निर्णय ग्रामपंचायत कडून घेतला गेला नाही.  आज या विषयावर अंतिम तोडगा न काढल्यास कामबंद आंदोलन करण्याचा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी निर्णय घेतल्यानंतर सरपंच आदेश कोळी यांनी ग्रामपंचायत सदस्यांसह  आंदोलकांना सामोरे जात कोणत्याही परिस्थितीत येत्या तीन चार दिवसांत त्यांचे ग्रामपंचायतकडे थकलेला संपूर्ण पगार दिला जाईल, असे आश्वासन दिले. त्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलक ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी आपले काम बंद आंदोलन स्थगित केले आहे.
 
Top