मुरुम, ता. उमरगा, दि. ७ : कारखान्यांनी केवळ साखर उत्पादन आणि उपपदार्थांवर अवलंबून न राहता, यापुढच्या काळात सीएनजीसारखे बायोगॅस प्रकल्प सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने अशा नवीन प्रकल्पांना मंजुरी देण्याचा निर्णय घेतला आहे. सदर प्रकल्पांमध्ये प्रतिदिन २५०० किलो सीएनजी गॅस ११ मे.टन सेंद्रीय खत व लिक्वीड फर्टीलायझर उत्पादीत करण्यात येणार असून त्यामुळे पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅस वापराचे प्रमाण कमी होऊन परिसरातील जनतेचा आर्थिक फायदा होऊन प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.
या प्रकल्पामध्ये उत्पादीत झालेला सेंद्रिय खत कारखाना परिसरातील शेतकऱ्यांना स्वस्त दराने विक्री करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा एकूण अंदाजे खर्च ३० कोटी इतका असणार आहे. तयार झालेला सीएनजी गॅस आपले ऊस वाहतूक करणारे ट्रक-ट्रॅक्टर यांना रुपये ४८ प्रति किलो दराने पुरवठा केल्यामुळे डिझेलवर होणाऱ्या खर्चात बचत होणार असल्याचे मत बसवराज पाटील यांनी व्यक्त केले. मुरुम येथील विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना परिसरात विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना व बागलकोट येथील प्रकृती रिनिवेबल एनर्जीजच्या संयुक्त विद्यमाने प्रेसमडवर आधारीत बायो-सीएनजी प्रकल्पाच्या भूमीपूजन समारंभ प्रसंगी गुरुवार (ता. ७) रोजी अध्यक्षस्थानावरुन उद्धाटक म्हणून ते बोलत होते.
यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापुराव पाटील, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरण पाटील, बिदरचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष कुशाल पाटील, सांगलीचे नामदेव बिरदे, शरद पाटील कारखान्याचे व्हाईस चेअरमन सादिकमियाँ काझी, जिल्हा बँकेचे संचालक दत्ता पाटील, संचालक शरणाप्पा पत्रिके, महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सचिव दिलीप भालेराव, किल्लारी कारखान्याचे व्हाईस चेअरमन विजयकुमार सोनवणे, विठ्ठलराव पाटील, शिवमूर्ती भांडेकर गुरुजी, केशव पवार, माणिकराव राठोड, संगमेश्वर घाळे, दिलीप पाटील, अँड. व्ही. एस. आळंगे, शिवलिंग माळी, प्राचार्य डॉ. दिलीप गरड, जिल्हा परिषदेचे सदस्य रफिक तांबोळी, सचिन पाटील आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना पाटील म्हणाले की, देशात उसाचे आणि साखरेचे अतिरिक्त उत्पादन होते आहे. त्यामुळे अतिरिक्त साखर उत्पादनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. साखर कारखान्यांनी केवळ साखर उत्पादन न करता इथेनॉल, वीज, डिस्टिलरी या उपपदार्थांबरोबरच सीएनजी बायोगॅससारखे प्रकल्प सुरू करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. सीएनजी गॅस हा
साखर कारखान्यातील मळी (प्रेसमड) पासून बायोगॅस तयार करता येणार आहे. अद्ययावत तंत्रज्ञानामुळे मळीपासून सहा प्रकारचे गॅस तयार करता येणार आहेत. शिवाय उसाचे पाचट, भुस्सा, मका व गव्हाचे काड, कापसाची पळाटी यापासूनही सीएनजी बायोगॅस तयार करता येणार आहे. सीएनजी बायोगॅस निर्मिती होणार असल्याने त्याचा शेतकऱ्यांनाही फायदा होणार आहे. केवळ साखर उत्पादन करून चालणार नाही तर इथेनॉल, गॅस यांसारखे प्रकल्प सुरू करणार असल्याचे बसवराज पाटील यांनी शेवटी म्हटले.
कुशाल पाटील, शरद पाटील, नामदेव बिरदे आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. बी. अथनी यांनी केले. सुत्रसंचालन राजु पाटील तर आभार संचालक विठ्ठल बदोले यांनी मानले. या वेळी कारखान्याचे संचालक, सभासद, शेतकरी, विविध संस्थांचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.