तुळजापूर दि १८ 


आराधी, गोंधळी आणि तृतीयपंथीय भाविक भक्त आई राजा ,उदो उदो चा जयघोष आणि मंगल वाद्याचा निनाद अशा वातावरणात चैत्री पौर्णिमेच्या निमित्ताने श्री   तुळजाभवानीच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी दोन दिवस तुळजापुरात दिसून आली, सुमारे अडीच लाख भाविकांनी दर्शन घेतले.

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने चैत्री पौर्णिमेच्या निमित्ताने भाविकांना दर्शनासाठी शारदीय नवरात्र महोत्सव याप्रमाणे जय्यत तयारी केली होती. या तयारीच्या अनुषंगाने येणाऱ्या भाविकांना जलद गतीने पहिला  आणि दुसरा दोन दिवसाच्या भाविकांच्या गर्दीचा अंदाज घेतला असता सुमारे अडीच लाख भाविकांनी दर्शन घेतल्याचे दिसुन आले. हजारो भाविक राजे शहाजी महाद्वार येथून कळस दर्शन करून येरमाळा येथील येडाईच्या दर्शनासाठी दाखल झाले.

पौर्णिमेच्या निमित्ताने रात्री दहा वाजता तुळजाभवानी मंदिराच्या परिसरात देवीचा छबिना निघाला विश्वस्त आणि पुजारी बांधव यांच्या उपस्थितीत पाळीचे पुजारी सचिन परमेश्वर यांनी भाविकांना अंगारा दिला आई राजा उदो उदो च्या जयघोषात पोत ओवाळद भाविक भक्तांनी दर्शन घेतले यादरम्यान मंदिरातील असणाऱ्या स्टेडियम परिसरात शेकडो भाविक भक्त छबिना पाहण्यासाठी उपस्थित होते तुळजाभवानी देवीची चांदीची मूर्ती छबिन्याचा वाहनामध्ये स्थानापन्न केली होती तीन प्रदक्षिणा झाल्यानंतर छबिना उत्सव पूर्ण झाला


पुणे जिल्ह्यांमधून मोठ्या संख्येने भाविक भक्त आणि छोट्या छोट्या मंदिरातील देवीच्या मुर्त्या वाजत-गाजत मंदिरात आणल्या गेल्या. मागील दोन वर्षापासून तुळजापुरात येण्याची आमची झालेली कुचंबणा यावर्षी दूर झाली आहे. देवीचे दर्शन आणि आम्ही आनंदी झालो आहोत अशी प्रतिक्रिया फुरसुंगी जिल्हा पुणे येथील संकेत पवार आणि मनीषा गणेश कामठे यांनी दिली.
 करमाळा येथील दत्तात्रय क्षीरसागर म्हणाले की तुळजाभवानी देवीची आराधना करणे हे आम्हासाठी प्रेरणादायी आहे. वर्षभर आम्ही चैत्री पौर्णिमेच्या निमित्ताने दर्शन घेण्यासाठी उत्सुक असतो.  


दरम्यान शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पॅटर्न प्रमाणे मंदिर संस्थांकडून भाविकांना दर्शन देण्यासाठी दर्शनाचा रांगा तयार केल्या होत्या. या रांगा कुंभार गल्ली मार्गे दर्शन मंडपात आणल्या गेल्या होत्या. पुढे नियमित मार्गाने भाविकांना दर्शन देण्यात आले . एक तास वीस मिनिटे एवढ्या वेळेमध्ये भाविकांना दर्शन देण्याची व्यवस्था संस्थांकडून करण्यात आली होती. यादरम्यान सर्वत्र पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्यामुळे यात्रा शांततेत पार पडली. राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने येरमाळा जाण्यासाठी विशेष बस व्यवस्था केली होती. याशिवाय खाजगी व्यवसायिकांनी देखील येरमाळा जाण्यासाठी गाड्या उपलब्ध करून दिल्या होत्या.


पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवली


या यात्रेदरम्यान कडक उन्हाळा असल्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवली पाणपोई आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कमी पडली, त्याचबरोबर भाविकांना त्यांच्या चपला ठेवण्यासाठी मंदिर संस्थांकडून चप्पल स्टॅन्ड केलेले नसल्यामुळे मंदिर परिसरात सर्वत्र चपलांचा खच दिसून आला. अनेक भाविक आपल्या चपला शोधण्यासाठी अंधारामध्ये चाचपडताना दिसत होते.

यादरम्यान बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा दिसून आला. कचरा उचलण्याची तातडीची व्यवस्था अपुरी होती. गर्दी आणि कचरा यामुळे मंदिर परिसरात अस्वच्छतेचे वातावरण राहिले.


भावीक भक्तांची सोय करण्यासाठी तुळजाभवानी मंदिर संस्थांननी मंदिर संस्थांच्या निधीमधून चप्पल स्टँड आणि पानपोई उभारावेत अशी भाविकांची मागणी आहे.  शहराच्या सर्व भागात जेथे वाहनतळ केलेले आहेत तेथे देखील पिण्याच्या पाण्याची कमतरता होती.
 
Top