उस्मानाबाद दि.४ :
जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील सर्व उसाचे गाळप करावे या मागणीसाठी बळीराजा पार्टीच्यावतीने उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि.४ एप्रिल रोजी लाक्षणिक धरणे आंदोलन केले.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, बळीराजा पार्टीकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या तक्रारी आलेल्या आहेत. या तक्रारीनुसार शेतकरी कारखान्याचे सभासद असून देखील त्यांचा ऊस कारखान्याने घेवुन गेले नाही. मात्र कारखाने बाहेरून ऊस आणून त्याचे गाळप करीत आहेत. बळीराजा पार्टीच्या वतीने दि. २१ मार्च रोजी सोलापूर-औरंगाबाद रस्त्यावरील येरमाळा चौरस्त्यात १ तास उभे राहून चौकशी केली असता जवळपास ७५ टक्के ऊस बीड, माजलगाव, गेवराई, केज व धारूर या भागातून येत असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच वाहन व ऊस मालकाकडे चौकशी केली असता एकरी ५ हजार रुपये ऊस तोडणीसाठी व ड्रायव्हर भत्ता म्हणून १ हजार रुपये प्रती ट्रीप असे रोख शेतकऱ्याकडून घेतले जात असल्याचे नमुद केले आहे. तर कारखाना एरिया बाहेर आहे म्हणून १९०० रुपये प्रती टन ऊस खरेदी करीत आहेत. त्यावर शासनाचे कुठलेही नियंत्रण नसल्यामुळे शेतकऱ्यांची लूटमार चालू आहे. येत्या १० दिवसांत या कारखान्याने आपापल्या क्षेत्रातील सभासद व बिगर सभासद मराठवाडा अध्यक्ष अच्युत पुरी,शेतकऱ्यांना ऊस प्राधान्याने नेवून गाळप करावे. तसेच जे शेतकरी कारखान्याचे सभासद व नोंद असताना देखील महिन्याच्या पुढे प्रोग्राम येऊन देखील ऊस तोडणी करीत नाहीत. या शेतकऱ्यांचे संबंधित कारखान्याने नुकसान भरपाई देण्याचे आदेश काढण्यात यावेत आदी मागण्यासाठी आंदोलन करण्यात आले.
यावेळी उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष तात्या रोडे, जिल्हा महासचिव महादेव कांबळे, कळंब तालुकाध्यक्ष कल्याण तवले पाटील, बिभीषण कदम, एल.जी. शेख, राजेंद्र गायकवाड, हरिदास जाधव, राजकुमार देवकर व मोहन कदम आदी सहभागी झाले होते.