नळदुर्ग , दि . ०७ :विलास येडगे

रामतीर्थ (नळदुर्ग) येथील श्री क्षेत्र रामतीर्थ देवस्थान येथे देवस्थानचे महंत श्री विष्णु शर्मा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली दि.९ व १० एप्रिल २०२२ रोजी भव्य श्री राम जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येणार आहे. 


यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या सर्व कार्यक्रमास रामभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन देवस्थान कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.
    

 संपुर्ण देशात दि.१० एप्रिल रोजी श्री राम जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात व धुमधडाक्यात साजरा होणार आहे. रामतीर्थ (नळदुर्ग) येथील श्री क्षेत्र रामतीर्थ येथेही दि.९ व १० एप्रिल रोजी श्री राम जन्मोत्सव सोहळा महंत विष्णु शर्मा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात येत आहे.  श्री क्षेत्र अतीशय पवित्र व पावन आहे. कारण याठिकाणी श्री प्रभु रामचंद्र हे दोन वेळेस येऊन गेल्याचे सांगितले जाते . प्रभु श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भुमी आहे . त्यामुळे या श्री क्षेत्र रामतीर्थला अनन्य साधारण महत्व आहे.
       

या देवस्थानचे महंत श्री विष्णु शर्मा महाराज व रामभक्त याठिकाणी श्री राम जन्मोत्सव सोहळा भव्य, दिव्य प्रमाणात साजरा व्हावा यासाठी प्रयत्नशिल  आहेत. दरवर्षी याठिकाणी श्री राम जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो.
       

दि.९ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता भजन, कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. त्याचबरोबर रात्री १२ वा. महाआरती व श्रीराम शृंगार हा कार्यक्रम होणार आहे. दि.१० एप्रिल रोजी सकाळी ८ वा. पवित्र असणाऱ्या रामकुंड येथील जल आणुन जलकलश अभिषेक व श्रीराम शृंगार करण्यात येणार आहे. तसेच दुपारी १२ वा. श्रीराम जन्मोत्सव व पुष्पवृष्टी हा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर दुपारी १ ते ४ या कालावधीत उपस्थित रामभक्तांना महाप्रसाद देण्यात येणार आहे.


 श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यानंतर दि.१५ व १६ एप्रिल २०२२ या कालावधीत याठिकाणी श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येणार आहे.दि.१५ एप्रिल रोजी रात्री ८ वा.भजन व संध्या जागरण हा कार्यक्रम होणार आहे. तसेच दि.१६ एप्रिल रोजी सकाळी ११ वा.सार्वजनिक हनुमान चालिसा पठण व महाआरती तसेच दुपारी १२ ते ४ यावेळेत भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.रात्री ८ वा."सुंदरकांड" व आरती असे कार्यक्रम होणार आहेत. श्री राम जन्मोत्सव सोहळा व श्री हनुमान जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आयोजित केलेले सर्व कार्यक्रम महंत श्री विष्णु शर्मा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली व रामभक्तांच्या सहकार्याने संपन्न होणार आहेत.

 
Top