नळदुर्ग ,दि . ११ :
येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात अतिरीक्त जिल्हाधिकारी तथा जात पडताळणी समितीचे अध्यक्ष बी.जी. पवार यांच्या शुभहस्ते जयंतीनिमित्त महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून जात पडताळणी मोहीमेचा शुभारंभ झाला.
अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. संजय कोरेकर होते. संशोधन अधिकारी तथा सचिव श्री. एस. टी. नाईकवाडी, अभिलेखापाल श्री. एस. एम. कठारे, संशोधन सहाय्यक यु. टी. जाधव, उपप्राचार्य डॉ. रामदास ढोकळे, डॉ. मनोज झाडे, डॉ. दगडू सुयर्वंशी, डॉ. सुभाष राठोड, डॉ. उद्धव भाले यांची व्यासपिठावर उपस्थिती होती.
शासन व उस्मानाबाद जिल्हा समाज कल्याण विभागाच्यावतीने सामाजिक न्याय सप्ताह साजरा केला जात आहे. त्या अनुषंगाने आज नळदुर्ग महाविद्यालयात त्याचा शुभारंभ करण्यात आला. डॉ पवार बोलताना म्हणाले की जात पडताळणीसाठी येणारे अर्ज हे बहुसंख्येने असतात पण ती आपण ज्यावेळेस त्याची गरज असते त्यावेळेसच असा अर्ज केला जातो त्यामुळे तुम्हाला वेळेवरती जात पडताळणीचे प्रमाणपत्र मिळू शकत नाही याची आम्हाला जाणीव आहे. म्हणूनच हा सप्ताह या संदर्भाने जनजागृती करण्यासाठी राबविला जातो आहे. त्याचबरोबर जात पडताळणी मिळण्याबाबत येणाऱ्या अडचणीच्या अनुषंगाने त्यांनी उहापोह केला. नायकवाडी यांनी जात पडताळणीसाठी ऑनलाइन अर्ज कसा भरावा, त्यासाठी लागणारी कागदपत्रे कशी मिळवावी या अनुषंगाने सखोल माहिती दिली.
अध्यक्षस्थानावरुन प्राचार्य डॉ. संजय कोरेकर बोलताना म्हणाले की केवळ परिपूर्ण माहिती आपल्याला माहीत नसल्यामुळे अनेक जण शिष्यवृत्ती, स्कॉलरशिपचा फॉर्म भरण्यास तयार नसतात. पण आज आपल्या महाविद्यालयात प्रशासनातील संबंधीत अधिकारी येऊन सविस्तर असे मार्गदर्शन केल्यामुळे माझ्या विद्यार्थ्यांना व्यवस्थित माहिती मिळाली आणि त्यामुळे भविष्यात कोणीही शिष्यवृत्ती आणि स्कॉलरशिप पासून वंचित राहणार नाही याची आज खात्री वाटत आहे. या मोहिमेला नळदुर्ग महाविद्यालयाला सामावून घेतल्याबद्दल त्यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना व प्रशासनाला धन्यवाद दिले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मनोज झाडे यांनी, सुत्रसंचालन डॉ. संतोष पवार तर आभार डॉ. सुभाष राठोड यांनी मानले.
यावेळी डॉ. निलेश शेरे, डॉ. महेंद्र भालेराव, डॉ. अशोक कांबळे, प्रमोद कांबळे, सुरेश गायकवाड, काशिनाथ कोळी, भागीनाथ बनसोड, अतुल बनसोडे आदिसह विद्यार्थी - विद्यार्थिनी उपस्थित होते.