तुळजापूर दि ३  :

तुळजापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण भागातील लोकांसाठी सक्षमपणे सेवा देण्याच्या अनुषंगाने आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी जाणीवपूर्वक लक्ष द्यावे अशी मागणी आमदार संवाद मंचच्या वतीने महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने करण्यात आली.

तुळजापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झालेल्या आमदार संवाद मंच या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ क्रीडा संजय पारवे हे होते. बैठकीमध्ये भाजयुमो तालुकाध्यक्ष रुग्ण सेवा समितीचे सदस्य आनंद कंदले, नगरसेवक नागेश नाईक,शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शाम पवार,  मधुकराव चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक बबनराव जाधव, आमदार संवाद मंच अध्यक्ष डॉ. सतीश महामुनी, काँग्रेस सेवादलाचे तालुकाध्यक्ष तानाजी जाधव, भाजपाचे जिल्हा चिटणीस गुलचंद व्यवहारे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हा सरचिटणीस तानाजी कदम, शेकापचे नेते किरण खपले, समाजसेवक संजयकुमार बोंदर, पत्रकार संजय गायकवाड,  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते महेश चोपदार, छावा क्रांतीवीर जिल्हा अध्यक्ष महेश गवळी, काँग्रेस युवक नेते फरीद शेख, समन्वयक अनिल आगलावे यांची याप्रसंगी उपस्थिती होती. 


आमदार संवाद मंच बैठकीमध्ये संपर्क संस्था मुंबई यांच्या निर्देशाप्रमाणे महाराष्ट्रामधील विधानसभा क्षेत्रातील आमदारांनी आपल्या मतदारसंघातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सक्षमीकरणासाठी आरोग्य केंद्र दत्तक घेण्याच्या योजना सुरू केल्या आहेत. याच अनुषंगाने तुळजापूर विधानसभा मतदारसंघांमधून मंगरूळ, काटगाव, अणदूर,  सलगरा दिवटी , जळकोट, सावरगाव, तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालय  येथे सामान्य नागरिकांना सुरळीत व उत्तम आरोग्य सुविधा मिळण्याच्या अनुषंगाने लक्ष घालण्याची विनंती करण्यात येणार आहे. आमदार संवाद मंच शिष्टमंडळाच्या वतीने आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची भेट घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्र मधील सर्व सुविधा अद्यावत आणि तत्पर होण्याच्या अनुषंगाने पुढील काळात लक्ष दिले जाणार आहे. 


शासन मोठ्या प्रमाणात निधी खर्च करून वैद्यकीय अधिकारी तंत्रज्ञ कर्मचारी आणि इतर सोयी सुविधा उपलब्ध करून देते प्रत्यक्षात मात्र ग्रामीण भागातील नागरिकांना या सुविधेचा लाभ घेता येत नाही या विषयी मागील दोन वर्षांमध्ये अनुभव आल्यामुळे आमदार संवाद मंचच्या वतीने या समस्येकडे आमदार महोदय यांचे लक्ष वेधले आहे. याशिवाय शाळाबाह्य मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाजसेवक संजय कुमार बोंदर यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला आमदार संवाद मंच सक्रियपणे यापुढील काळात पाठिंबा देत आहे. येणारा पावसाळ्याच्या प्रारंभी आमदार संवाद मंच कडून आरळी बुद्रुक येथील संजय पारवे यांनी निर्माण केलेल्या सहा एकर क्षेत्रावरील क्रीडांगण वर वृक्षारोपण करण्यात येणार आहे. खोताची वाडी येथील गायरान क्षेत्रावर वृक्षारोपण करणे आणि येथील पिण्याच्या पाण्याच्या समस्येचा अनुषंगाने जिल्हा परिषद उस्मानाबाद यांच्याकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
 
Top