चिवरी , दि.१७: राजगुरू साखरे

उन्हाळा सुरू झाला की वेध लागतात ते फळांचा राजा आंब्याचे आगमनाचे. यंदा मात्र फळांचा राजा म्हणून ओळखला जाणारा आंबा यंदाच्या उन्हाळ्यात भाव खाऊन जात आहे. अर्धा मे महिना उजडला तरी आंब्याची आवक बाजारात परिपूर्ण झाली नाही. परिणामी  रसपोळ्या खायच्या दिवसात खव्वयांना  चपाती भाजीचाच आधार घ्यावा लागत आहे. 



उन्हाळा आला की प्रतिवर्षी आंब्याची आवक मोठ्या प्रमाणावर असते. टरबूज ,केळी ,कलिंगड ,द्राक्षे या फळा नंतर आंबा मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल होतो. मात्र यंदाच्या उन्हाळ्यात विविध जातीच्या आंब्याचे उत्पादन घटल्याने आंब्याचे भाव वाढले आहेत. यंदाच्या वर्षात थंडी उशिरा आली होती त्यामुळे मोहरही उशिरा लागला  मात्र दरम्यानच्या  काळात अल्प प्रमाणातील थंडी व धुक्याचा प्रादुर्भावामुळे मोहर गळती झाली.

  एकंदरीत उत्पादन घटल्याने आंब्याचे भाव वाढल्याचे दिसून येत आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये प्रत्येक घरोघरी रस -पोळी, रस- चपाती व धीरडे रसाचे आवडीने   सेवन केले जाते. ग्रामीण भागात तर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये एखादा पाहुणा आला की हमखास रस पोळ्याची मेजवानी असते.तसेच  बच्चे कंपनीना सुट्टया लागल्या की मामाच्या गावची ओढ असते, मामाच्या गावी जाऊन आमरसाचा मनसोक्त आस्वाद, घेतला जायचा . मात्र यंदा आंब्याचे उत्पादन घटल्याने बच्चे कंपनीचाही हिरमोड झाला आहे. 


सध्या बाजारात आंबा प्रति किलो शंभर रुपये पासून ते सहाशे रुपये पर्यंत विकला जात आहे. एकंदरीत यंदा बदलत्या हवामानाच्या फटक्यामुळे आवक घटल्याने तसेच भाव वाढल्याने खवय्यांचा हिरमोड झाला आहे.
 
Top