तुळजापूर ,दि. ३० :
उस्मानाबाद येथे स्वतंत्र विद्यापीठ स्थापनेसाठी मागणी केल्यामुळे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य संजय निंबाळकर यांच्यावर औरंगाबाद येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा तुळजापूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या वतीने निषेध करण्यात आला.
यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या वतीने उस्मानाबाद येथे स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्यात यावे याच मागणीसाठी औरंगाबाद येथील विद्यापीठात मागणी करणारे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य संजय निंबाळकर यांच्यावर करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ तुळजापूरचे तहसीलदार सौदागर तांदळे यांना निवेदन देण्यात आले. बालाघाट शिक्षण संस्थेचे सहसचिव शहबाज काझी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनिल शित्रे, उपप्राचार्य डॉ. नरसिंग जाधव, सिनेट सदस्य डॉ. गोविंद काळे, सिनेट सदस्य प्रा. संभाजी भोसले, प्रा. ए. टी. कदम, प्रा. एन.एस. कदम, डॉ. सतीश महामुनी, डॉ. राजेश बोपलकर, डॉ. अभिजित बाबरे, श्री. सनी बनसोडे,डॉ. मंदार गायकवाड यांची यावेळी उपस्थिती होती.
भौगोलिक दृष्ट्या उस्मानाबाद येथे विद्यापीठ होणे अत्यंत गरजेचे आहे. मुलांना विशेषता मुलींना २७५ किलोमीटर औरंगाबाद येथे उच्च शिक्षणासाठी जाण्याच्या अडचणीमुळे मुली शिक्षणापासून दूर आहेत. त्यामुळे उस्मानाबाद येथे विद्यापीठ उभारणे अत्यंत गरजेचे आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रत्येक महाविद्यालय एक तर स्वायत्त पदवी देणारे महाविद्यालय किंवा विद्यापीठाचे घटक महाविद्यालय म्हणून विकसित होणार आहे.
या धोरणानुसार उस्मानाबाद येथे स्वतंत्र विद्यापीठ होणे अत्यंत न्यायोचित आहे .म्हणून महाविद्यालय या मागणीला पाठिंबा देत आहे असे निवेदनात म्हटले आहे.
राज्याचे राज्यपाल, उच्च व तंत्र शिक्षण विभाग प्रधान सचिव, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, विद्यापीठाचे कुलगुरू आणि उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांना या निवेदनाच्या प्रती देण्यात आल्या आहेत.