नळदुर्ग , दि . ०४ : विलास येडगे

महाराष्ट्रात गाजत असलेल्या भोंगा या विषयांमुळे सर्वत्र गोंधळाचे वातावरण निर्माण होऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील अनिधिकृत भोंगे व त्यांचा मर्यादित आवाज या विषयांवर संपुर्ण देशात रान पेटविले आहे .


 याबाबतीत त्यांनी नुकतीच औरंगाबाद  येथे जाहिर सभाही घेतली होती . या सभेतुन आक्षेपार्ह विधान केल्यामुळे व सभेस परवानगी देताना घालून दिलेल्या अटीं व शर्थींचे पालन न केल्यामुळे राज ठाकरे यांचेसह औरंगाबाद  येथील पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झालेले आहेत . राज ठाकरे यांनी भोंग्यांबाबत  अल्टिमेटमही दिलेला होता . त्याप्रमाणे जीथे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे भोंग्याबाबत पालन होत नाही . तिथे मनसेतर्फे दुप्पट आवाजात हनुमानचालिसा लावण्यात यावी . असे कार्यकर्त्यांना सांगितले होते .
     

सरकारने याची दखल घेऊन राज्यामध्ये कुठेही अनुचित प्रकार घडु नये म्हणून संपूर्ण राज्यभर मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पोलीसामार्फत कलम १४९ च्या नोटीसा दिल्या . राज्यांतील बहुतांश ठिकाणी राज ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुस्लिम धर्मीयांनी मशिदींवरील अनधिकृत भोंगे हटवले व परवानगी घेतलेल्या भोंग्यांचा आवाज नियमाप्रमाणे ठेवण्यात आला . कांही ठिकाणी परवानगी नसल्याने भोंग्याविना अजान झाली .असे असताना उस्मानाबाद  जिल्ह्यातील नळदुर्ग येथील मुस्लिम धर्मगुरु अलहाज सगीर जागिरदार यांनी सर्व मुस्लिम धर्मीयांना आवाहन करून सांगितले आहे की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून, इतर धर्मीयांना कसल्याही प्रकारचा त्रास न होता, आजान म्हणावी . अजानसाठी भोंग्यांची परवानगी घ्यावी, आवाज ठरवून दिलेल्या मर्यादेतच असावा, आणि हे भोंगे रात्री १० ते पहाटे ५ या वेळेत बंद असावेत .
    

मुस्लिम धर्मींयांच्या एका मोठ्या धर्मगुरूंनीच असे आवाहन करून दोन समाजील तेढ कमी करून सामाजिक सलोख्याचे व ऐक्याचे दर्शन घडविल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उस्मानाबाद  जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांनी त्यांच्या सर्व सहका-यांसह धर्मगुरू अलहाज सगीर जागिरदार यांचा सत्कार केला . 
   

यावेळी बोलताना   नवगिरे म्हणाले की, ज्या धर्मीयांच्या भावना दुखावल्या म्हणून आघाडी व ठाकरे सरकारने जाणीवपूर्वक व सुडबुध्दीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचेवर औरंगाबाद  मध्ये गुन्हा नोंद केला व मनसे कार्यकर्त्यांना नोटिसा देऊन दडपशाही केली, त्याच धर्माच्या व समाजाच्या धर्मगुरूंनी राज ठाकरे यांच्या भूमिकेचे समर्थन केले आहे . मग केवळ जाणीवपूर्वक व सुडबुद्धीने राज ठाकरे यांच्यावर गुन्हा नोंद करणे व नोटीसा देणे , हे या आघाडी सरकारला खूप महागात पडणार आहे . येणाऱ्या काळात जनता त्यांना त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही . मनसे कार्यकर्ते अशा नोटिशींना व दडपशाहीला अजिबात भीक घालत नाही . सरकारला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील .
   

या कार्यक्रमास मुलिम समाजाचे धर्मगुरू अलहाज सगीर जागीरदार, मनसे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक  सिद्धेश्वर गोरे,   सुधीर मोटे, पोलीस कर्मचारी, मुस्लिम समाजातील मान्यवर व्यक्ती, मनसेचे जिल्हासचिव जोतिबा येडगे, नळदुर्ग शहराध्यक्ष अलिम शेख, शहर सचिव प्रमोद कुलकर्णी, उपाध्यक्ष रमेश घोडके, धनंजय मडोळे, अजय डांबरे यांचेसह हिंदु व मुस्लिम समाजातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

पोलीस विभागाच्या वतीने धर्मगुरू अलहाज सगीर जागीरदार व मनसे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांचा सत्कार सहाय्यक पोलीस निरीक्षक  गोरे यांनी केला . व या घटनेचा आदर्श संपूर्ण महाराष्ट्रानेच नव्हे तर देशाने घ्यावा असे सांगितले .
 
Top