नळदुर्ग ,दि.०५ विलास येडगे :
ऐतिहासिक नळदुर्ग नगरीत श्री १००८ आदिनाथ दिगंबर जैन मंदिरात शुक्रवार दि.६ ते १० मे २०२२ या कालावधीत पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पाच दिवस चालणा-या या महोत्सवात विविध धार्मिक भरगच्च कार्यक्रम होणार आहेत.
पंचकल्याणक प्रतिष्ठा म्हणजे भगवान होण्याची प्रक्रीया आहे. पाषाणामध्ये प्राणप्रतिष्ठा करून त्यामध्ये देवत्वाची स्थापना केली जाते. ज्यामुळे ती पाषाणाची मुर्ती जिवंत परमात्म्याप्रमाणे पुज्य बनते असे परमपुज्य १०८ आचार्यश्री सुयशसागरजी महाराज यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना सांगितले.
नळदुर्ग येथे होत असलेल्या पंचकल्याणक महोत्सवाची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेस परमपुज्य १०८ आचार्यश्री सुयशसागरजी महाराज, पुज्य १०५ आर्यिकाश्री शुधोंहंश्री माताजी व पुज्य १०५ क्षुल्लकश्री सुनम्रसागरजी महाराज हे उपस्थित होते.हा पंचकल्याणक महोत्सव परमपुज्य १०८ आचार्यश्री सुंदरसागरजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली व परमपुज्य १०८ आचार्यश्री सुयशसागरजी महाराज, परमपुज्य १०८ मुनीश्री सुहितसागरजी महाराज, पुज्य १०५ आर्यिकाश्री शुधोंहंश्री माताजी व पुज्य १०५ क्षुल्लकश्री सुनम्रसागरजी महाराज यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
शुक्रवार दि.६ मे रोजी गर्भकल्याणक सकाळी ६ वा. ध्वजारोहण, देव आज्ञा, गुरू आज्ञा, प्रतिष्ठाचार्य निमंत्रण,६.३० वा. घट यात्रा(शोभा यात्रा),मंदिर ते कार्यक्रम स्थळ (अयोध्या नगरी),८.३० मंडप उदघाटन चित्र अनावरण,श्रीं जिंचा अभिषेक,९.३० वा. आचार्य श्री का आशीर्वाचन आणि आहारचार्या,१०.३० वा. इंद्र प्रतिष्ठा, मंडप प्रतिष्ठा, दुपारी १ वा. यागमंडल विधान, त्यागी प्रवचन, सायंकाळी ५.१५ वा. हत्तीवरून धर्मध्वजा शोभायात्रा, सायंकाळी ७ वा. आरती, धर्मसभा, गर्भ कल्याणक संस्कार क्रिया आणि इंद्रदरबार.
शनिवार दि.७ मे रोजी जन्मकल्याणक सकाळी ६.३० वा. अभिषेक, शांतिधारा पुजन,७.३० वा. जन्मकल्याणक महोत्सव,९.३० वा. जन्मकल्याणक शोभा यात्रा, पांडुक शिला वर अभिषेक, प्रवचन, दुपारी २ वा.जिनसहस्त्रनाम यज्ञ,जन्मकल्याणक पुजन,३.३० वा. त्यागी प्रवचन, सायंकाळी ५.१५ वा. जिनवाणी शोभा यात्रा, सायंकाळी ७ वा. आरती, विद्वानों द्वारा धर्मसभा आणि पाळणा.
रविवार दि. ८ मे रोजी दिक्षाकल्याण सकाळी ६.३० वा.अभिषेक शांतिधारा पुजन, सकाळी ९ वा. मौजीबंधन, कन्या वृत्तस्विकार विधी, प्रवचन,सकाळी ९.३० वा.शोभायात्रा मंदिरा पर्यंत, मंदिर--वेदी--शिखर शुद्धी, दुपारी १ वा. राज्याभिषेक, वैराग्य दर्शन, दीक्षा संस्कार, सायंकाळी ५.१५ वा. भव्य हत्ती शोभायात्रा, सायंकाळी ७.१५ वा. आरती, धर्मसभा आणि सांस्कृतिक कार्यक्रम.
सोमवार दि.९ मे केवलज्ञानकल्याणक सकाळी ६.३० वा. अभिषेक, शांतिधारा, नित्य पुजन, सकाळी ९ वा. महामुनी ऋषभदेव की आहारचर्या, दुपारी १ वा. केवलज्ञान च्या आतील क्रिया, सुरी मंत्र प्रदान, समवशरण से दिव्यध्वनी, सायंकाळी ७ वा. आरती, विद्वानांची धर्मसभा आणि सांस्कृतिक कार्यक्रम.
मंगळवार दि.१० मे मोक्षकल्याणक सकाळी ६ वा. श्री भगवानांचे मोक्षगमन,६.३० वा. अभिषेक विधी, मोक्षकल्याणक पुजन,९.३० वा. श्री जी विराजमान, प्रवचन, रथोत्सव,११ वा. भव्य कलशारोहण,महामस्तकाभिषेक,दुपारी १२ वा. स्वामी वात्सल्य,१.३० वा. गुरुपुजन, अतिथी सन्मान आणि धर्मसभा, सायंकाळी ५ वा. भव्यनगर प्रभावना शोभायात्रा.
अशा प्रकारे या पंचकल्याणक महोत्सवात पाच भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. हा कार्यक्रम अतीशय भव्य, दिव्य असा साजरा होणार आहे. या कालावधीत होणाऱ्या कार्यक्रमामुळे प्रत्येक्षात स्वर्गातील देव ऐतिहासिक नळदुर्ग नगरीत अवतरल्याचा भास होणार आहे. या कार्यक्रमास उस्मानाबाद , औरंगाबाद , लातुर, बीड, सोलापुर, मुंबई, पुणे यासह राज्यातील अनेक जिल्ह्यातील जैन बांधवांसह राजस्थानसह इतर राज्यांतील जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. नळदुर्ग शहरात जैन धर्मियांची संख्या कमी असली तरी त्यांनी तन, मन आणि धनाने या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे परमपुज्य १०८ आचार्यश्री सुयशसागरजी महाराज यांनी म्हटले आहे. यापुर्वी असा कार्यक्रम झाला नाही किंवा भविष्यात असा कार्यक्रम होणे शक्य नाही त्यामुळे जैन धर्मियांसह इतर धर्मातील नागरीकांनीही या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे महाराजांनी म्हटले आहे.
या पत्रकार परिषेदेस श्रेणीक पाटील, सुधीर पाटील, प्रविण कासार, राजेंद्र पाटील, इंद्रजीत पाटील, शितल पाटील, मयुर पाटील, प्रतीक पाटील, केवल पाटील, पारस पाटील, दर्शन शेटगार, सुमित पाटील, अक्षत आवटे आदीजन उपस्थित होते.