जळकोट,दि.५ : मेघराज किलजे

तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथे माजी जिल्हा परिषद सदस्य गणेश  सोनटक्के मित्र मंडळाच्यावतीने महापुरुषांच्या जयंतीनिमित्त समाज प्रबोधनकार , महाराष्ट्र भूषण ह. भ. प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे  दि.१०मे २०२२ (मंगळवार ) रोजी सायंकाळी ७ ते १० या वेळेत भव्य हरी किर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.


जळकोट येथील मुंबई -हैदराबाद महामार्गावरील जिल्हा परिषद प्रशालेच्या मैदानावर ह.भ. प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे प्रबोधनपर किर्तन पार पडणार आहे. त्याचबरोबर कीर्तनापूर्वी महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्ताने अभिवादन कार्यक्रम पार पडणार आहे. या  सोहळ्याला तुळजापूर तालुक्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. त्याचबरोबर काही मान्यवरही उपस्थित राहणार आहेत. जळकोट हे गाव मध्यवर्ती ठिकाणी असून, सोलापूर, लातूर व उस्मानाबाद या तिनी जिल्ह्यातून श्रोते कीर्तन ऐकण्यासाठी गर्दी करणार हे लक्षात घेऊन , मैदानाची जय्यत तयारी करण्यात येत आहे. तसेच वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. तरी या कीर्तन सोहळ्याचा उस्मानाबाद, लातूर व सोलापूर या जिल्ह्यातील नागरिकांनी व श्रोत्यांनी लाभ घ्यावा. असे आवाहन गणेश सोनटक्के मित्र मंडळाने केले आहे.
 
Top