जळकोट ,दि.४ :
लातूर जिल्ह्यातील उदगीर याठिकाणी नुकत्याच संपन्न झालेल्या ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आयोजित करण्यात आलेल्या कविकट्टा या कार्यक्रमात तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील चौफेर कवी सुरज अंगुले यांनी सादर केलेल्या कवितांची काव्य रसिकांना चांगलीच भुरळ पडली.
रसिकांनी त्यांच्या कवितांना मनमुरादपणे दाद दिली. उदगीर येथील उदयगिरि महाविद्यालयाच्या प्रांगणात २२ ते २४ एप्रिल दरम्यान ९५व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले. या संमेलनासाठी देशभरातून साहित्यिक,लेखक,नवकवी आणि रसिकांनी हजेरी लावली.
यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कविकट्टा या सदरात राज्यभरातून आलेल्या नामवंत आणि उदयोन्मुख कवींनी आपल्या कवितांचे सादरीकरण केले. यामध्ये कवी सुरज रामचंद्र अंगुले यांनी सादर केलेल्या झोपडी या कवितेने रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. अंगुले यांच्या सादरीकरणाचेही रसिकांनी कौतुक केले.
दरम्यान संमेलन समितीच्यावतीने जेष्ठ कवी विवेक होळसंबे यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन अंगुले यांना गौरवण्यात आले.