मुरूम, ता. उमरगा, दि. १९ :
उमरगा तालुक्यातील समाजिक कार्यकर्ते तथा बसव प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष रामलिंग पुराणे यांना त्यांच्या सामाजिक योगदानाबद्दल चेन्नई येथील ग्लोबल ह्यूमन पीस युनिव्हर्सिटीच्या वतीने मानद डॉक्टरेट ऑफ सोशल वर्क ही पदवी प्रदान करण्यात आली.
शनिवारी (ता.१८) रोजी चेन्नई येथील भारतीय विद्या भवनात विद्यापीठाच्या विशेष दीक्षांत समारंभात कुलगुरू तथा पीपल फोरम ऑफ इंडिया भारत सेवक समाजचे चेअरमन डॉ. पी. मॅन्युएल, जीएचपीयूचे आंतरराष्ट्रीय संचालक तथा एचआयबीआय बिजनेस ग्रुप, दुबईचे संचालक डॉ. पिमए हक्कीम, तामिळनाडूचे माजी न्यायाधीश के. वेंकटेशन, अरबीट्रेटर एस. सिद्धारार्थन, तामिळनाडू राज्य सरकारचे माजी सचिव आयएएस अधिकारी संपतकुमार, माजी पोलीस आयुक्त एम. करुणांनीधी आदी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुराणे यांना सामाजिक कार्याबद्ल डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आले.
यावेळी उपन्यायधीश डॉ. सी. आर. भास्करण, सन टी व्ही गुरू डॉ. जया महेश, कॅम्पटीफ कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जयकुमार वासंते, इंडियन इंर्पोमेंट ट्रस्ट, दिल्लीचे डॉ. के. वलरमठी, एनकोर बिजनेस सिस्टमचे मॅनेजिंग डार्येक्टर डॉ. एन. वासुदेवन, कर्नाटक रिजनचे जॉईंट डायरेक्टर डॉ. रामचंद्रा, अकॅडमीक कौन्सिल विलीयट कोरिया आदींची प्रमुख उपस्थिती होती. बसव प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक कार्य करणारे रामलिंग पुराणे यांना नुकताच ग्लोबल ह्यूमन पीस युनिव्हर्सिटीची (जागतिक मानवी शांती विद्यापीठ) मानद "डॉक्टरेट ऑफ सोशल वर्क" ही पदवी प्रदान करण्यात आली आहे. पुराणे यांनी वयाच्या ४१ व्या वर्षी हे यश संपादित केले आहे. पुराणे हे एका सामान्य कुटूंबातून मुरूम शहरातील नेहरु नगर भागात राहणाऱ्या एका उच्च शिक्षीत व्यक्तिमत्वाने बसव प्रतिष्ठानच्या माध्यमातून राज्यातील विविध प्रश्नांना घेऊन विशेष करून होमगार्डच्या प्रश्नासाठी मुंबईत जनआंदोलन उभे करून त्यांच्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी प्रयत्न केले.
उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकरी, बेरोजगारांचे प्रश्न असो वा उमरगा तालुक्यातील ग्रामीण भागातील खेडोपाडी जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था पाहून या रस्त्याकरिता शासन-प्रशासन दरबारी अनेक निवेदने देणे, तो प्रश्न मार्गी लावेपर्यंत सनदशीर, लोकशाही पध्दतीने विविध आंदोलने उभी करणे, त्याचा सततचा पाठपुरावा करणे व ते अनुदान प्राप्त करून त्याची अंमलबजावणी होईपर्यंत लक्ष देणे. या त्यांच्या कार्य कुशलतेमुळेच त्यांना सामाजिक कार्यकर्ता म्हणून सर्वदूर ओळखले जाते. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना मानद "डॉक्टरेट ऑफ सोशल वर्क" या पदवीने सन्मानित करण्यात आल्याची बातमी कळताच विविध सामाजिक संस्था, संघटना, पत्रकार मित्र, ग्रामस्थ, मित्र परिवारांनी त्यांचे विशेष कौतुक करून अभिनंदन केले आहे. यापूर्वीही त्यांना जननायक, समाजचिंतक, समाजभूषण, कोरोना योद्धा अशा विविध पुरस्काराने सम्मानित करण्यात आले आहे.
डॉ. रामलिंग पुराणे, समाजसेवक
मला मिळालेल्या डॉक्टरेट पदवीचा मी एकटा हक्कदार नसून माझ्या आई-वडीलासह,पत्नी, सामाजातील विविध क्षेत्रातील मला मार्गदर्शन व सहकार्य करणारे समस्त शहरवाशीय नागरिक, प्रसार माध्यमे यांना मी हे पदवी समर्पित करतो. सदर पदवीमुळे मला निश्चितच प्रेरणा व ऊर्जा मिळाल्याने या पुढच्या काळात देखील याहीपेक्षा अधिक काम करण्याची उर्मी मिळाल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.