शहरातील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना यांच्या संयुक्त विद्यमाने "आजादी का अमृत महोत्सव" अंतर्गत हर घर तिरंगा रॅली नळदुर्ग शहरात काढण्यात आली.
भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, जनतेच्या मनात या स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील क्रांतिकारक, घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात राहावी, या उद्देशाने या दैदिप्यमान इतिहासाचे अभिमान पूर्वक संस्मरण करण्यासाठी "हर घर तिरंगा" या उपक्रमा अंतर्गत ही रॅली काढण्यात आली होती.
या रॅलीचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय कोरेकर यांनी केले. हि रॅली महाविद्यालयातुन मुख्य रस्त्याने नळदुर्ग नगरपरिषद येथे नेण्यात आली. याप्रसंगी नळदुर्ग नगर परिषदेचे मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार , नळदुर्ग पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे , माजी नगरसेवक नितीन कासार , माजी नगरसेवक विनायक अहंकारी, पत्रकार व नागरिक उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय कोरेकर यांनी रॅली काढण्या मागचा उद्देश स्पष्ट केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. निलेश शेरे तर आभार डॉ. सुभाष राठोड यांनी मांनले. यानंतर ही रॅली महाविद्यालयामध्ये आणून विसर्जित करण्यात आली. या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी सहभागी झाले होते. ही रॅली यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, सांस्कृतिक विभाग, क्रीडा विभाग तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी पुढाकार घेतले.