मुरूम, ता. उमरगा, ता. २२:
गेल्या दोन वर्षापासून आपण जागतिक कोरोना महामारीचा सामना करत आहोत. जगात विविध समस्या व आव्हाने असतानाही प्रजापिता विश्वविद्यालय केंद्र मात्र मनुष्यमात्रामध्ये शांती, संयम्, स्नेह व बंधूभाव जोपासण्याचे व विश्वशांतीचा संदेश देण्याचे महान कार्य या केंद्राच्या वतीने केले जात असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष शरणजी पाटील यांनी केले.
मुरुम येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सेवाकेंद्राच्या वतीने आजादी का अमृत महोत्सव व राजयोगिनी ब्र. कुमारी सोमप्रभा दीदी यांच्या ७५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून योग तपस्या भट्टी व ग्रंथतुला कार्यक्रम गुरुवारी (ता. २१) रोजी रत्नमाला मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शरणजी पाटील अध्यक्षस्थानी होते. यावेळी माऊंटआबु (राजस्थान) चे राजयोगी ब्र. कु. छोटेलाल भाई, सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. रंगनाथ जगताप, केंद्राचे संचालक ब्र. कु. राजूभाई भालकाटे, उमरगा पंचायत समितीचे माजी सभापती सचिन पाटील, सोलापूरचे उद्योजक रवींद्र कन्नुरे, माजी निवडणूक अधिकारी तुकाराम मस्के, आळंदच्या दीपा केशवानी, मंगला बहिजी, जेऊरच्या अश्विनी बहिजी, डॉ. वगण्णा, राजेंद्र फुंडीपल्ले, आनंद हिरवे, उमरगाचे उद्योजक मनोज थोरे, राजकुमार सूर्यवंशी, सुशांत मोहिते, श्रीकांत बेंडकाळे, डॉ. नितीन डागा, काशिनाथ मिरगाळे, प्रा. करबसप्पा ब्याळे, प्रा. सुधीर नाकाडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
ब्रह्माकुमारी राजयोगिनी सोमप्रभा दीदी यावेळी आशीर्वचन देताना म्हणाल्या की, मानुष्याने नेहमी चांगल्या गुंणांचा स्वीकार करत जगावे. चांगले गुण व आचरणच व्यक्तीला प्रतिष्ठा व श्रेष्ठत्व मिळवून देते. मला या कार्यक्रमाची पूर्व कल्पना नव्हती की, माझा वाढदिवस ग्रंथतुला या स्वरूपात होईल. हे माझ्यासाठी सुवर्णक्षणच मनावा लागेल. आपण सर्वांनी मिळून आपल्या हातून अशाच पद्धतीने सेवाभावीवृत्ती ठेवून जनसेवा हीच ईश्वरसेवा मानून सतत कार्य करण्याचा संदेश त्यांनी यावेळी शेवटी दिला. याप्रसंगी ब्रह्मकुमार छोटेलाल भाईजी, तुकाराम मस्के आदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रारंभी स्वागत गीत संगमेश्वर स्वामी यांनी गायले. कुमारी काव्या चौधरी हिने सत्यम्-शिवम्-सुंदरम या गीतावर नृत्य सादर केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने वृक्षारोपण व शहरातून शांततेचा संदेश देण्यासाठी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
रतनभाई पटेल, अनिता मिरकले, वैष्णवी दीदी, सविता भरदाळे, बाळासाहेब भालकाटे, दिलीप हंगरगे, आदींनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमास सोलापूर, उस्मानाबाद, उमरगा, दाळींब, कवठा, तावशी, कदेरसह शहरातील बहुसंख्येने माता-भगिनी व नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुरूमच्या प्रजापिता ब्रह्मकुमारी केंद्राचे संचालक ब्र. कु. राजूभाई भालकाटे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन लोहारा सेवाकेंद्राच्या संचालिका सरिता तर आभार शिल्पा यांनी मानले.