काटी,दि.२६: उमाजी गायकवाड 


तुळजापूर तालुक्यातील काटी, सावरगाव, दहिवडी, तामलवाडी, वडगाव (काटी), मंगरुळ,केमवाडीसह पंचक्रोशीतील गावासह उस्मानाबाद जिल्ह्या शेजारील उत्तर सोलापूर तालुक्यातील काही गावात कोरोना महामारीनंतर तब्बल 2 वर्षांनी शुक्रवारी  पोळा सण  उत्साहात साजरा करण्यात आला. 

या सणानिमित्त बळीराजाच्या खांद्याला खांदा लावून काम करणार्‍या बैलांचे पूजन करून त्यांची धुमधडाक्यात मिरवणूकही काढण्यात आली. एकंदरीत, बँड, हलगीच्या निनादात निघालेल्या बैलांच्या मिरवणुकीत अनेक युवा शेतकर्‍यांनी नाचून आपला आनंद द्विगुणीत केला.


गेल्या 3-4 वर्षांपासून या भागात पाऊस मुबलक पडत असल्याने पाणीसाठाही सर्वत्र होताना दिसत आहे. मात्र पिकांना पोषक पाऊस होत नसल्याने बळीराजा पाऊस असूनही आर्थिक अडचणीत सापडताना दिसत आहे. यावर्षीही पावसाने वेळेत सुरूवात केली. मात्र बि-बियाणे, खते महागल्याने बळीराजा आर्थिक अडचणीत सापडलाच. इतकेच नाहीतर नाना उलाढाली करून खरिपाची पेरणी करूनही काटी, सावरगाव,मंगरुळ तामलवाडीसह तुळजापूर तालुक्यातच अतिवृष्टी झाल्याने पिके जोमात येवूनही वाया गेल्याचे दिसुन येत आहे.  नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकरीवर्ग सध्या मागणी करीत आहेत. या अतिवृष्टीमुळे आपल्यासह आपल्या कुटुंबाची होणारी आर्थिक तारांबळ बाजूला ठेवून अनेक शेतकर्‍यांनी आपल्या जवळ पैसे नसले तरी उसनवारी करुन  बैलपोळा सण मोठ्या उत्साहात  साजरा केला. सर्जा-राजाची हौस करताना तो कोठेही कमी पडल्याचे दिसून आले नाही. काटी,तामलवाडी येथे तर तब्बल 3 वाजल्यापासून बैलांच्या मिरवणुका सुरू होत्या. त्या रात्री 10 वाजेपर्यंत चालल्या. तामलवाडी येथील मानाच्या पाटलांचे बैल वेसीत येवून तोरण तोडल्यानंतर तर काटी येथील सोसायटीचे चेअरमन तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विक्रमसिंह देशमुख, माजी चेअरमन सयाजीराव विजयसिंह देशमुख यांनी बैल वेसीत येऊन तोरण तोडल्यानंतर  एका-पाठोपाठ एक अशा बैलांच्या मिरवणुका सुरू झाल्या. बैलांना नटवून प्रथम ग्रामदेवतेचे दर्शन घेवूनच मिरवणुका पार पडल्या. तामलवाडीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मिरवणुका येताच हलगी, बँडच्या निनादात अनेक युवा बळीराजाने स्वत: ठेका धरत बैलांनाही नाचविले. फटाके फोडून अन् गुलाल उधळून त्यांनी आपला आनंद द्विगुणीत केला. या मिरवणुका पाहण्यासाठी अबालवृध्दांसह विशेषत: महिलांची मोठी गर्दी दिसून आली. या भागात गेल्या 10 वर्षांपासून पशुधन कमी झाले असले तरी अनेक मोठे शेतकरी आता पुन्हा हौसेने बैलजोड्या, जनावरे विकत आणत असल्याचे चित्र आज दिसून आले. या बैलांची घरच्या कारभारणीकडून पूजा करून त्यांना गोड पोळीचा प्रसाद दिला. खांदा मळणीपासून बैलपोळा होईपर्यंत बळीराजा बैलांच्या खांद्यावर शिवळही टेकत नाही. थोडक्यात सांगायचे म्हणजे सालातून किमान 2 दिवस तरी या बैलांना विश्रांती मिळावी, इतकाच मुख्य उद्देश या सणामागचा असल्याची माहिती काही जाणकार शेतकर्‍यांनी दिली.

शिवारात झाला मुबलक चारा

यावर्षीच्या 2 ते 3 नक्षत्रातील दमदार पाऊस या पंचक्रोशीत पडल्याने काटी,सावरगाव तामलवाडीसह पंचक्रोशीतील  वडगाव, सुरतगाव, माळुंब्रा, देवकुरळी, पिंपळा, दहिवडी, केमवाडी, मंगरुळ,आदी विविध गावातील ओढे, नदी-नाले, तलाव पाण्याने ओसंडून वाहत आहेत. अति पावसाने सोयाबीन पिकालाही मोठा फटका बसला असला तरी जनावरांना मात्र मुबलक चारा झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्‍न मिटल्याच्या प्रतिक्रिया काही शेतकर्‍यांनी नोंदविल्या.

बैलांच्या मिरवणुका शांततेत: सपोनि पंडित

कोरोना महामारीनंतर यावर्षी बैलांच्या मिरवणुकांचा मोठा उत्साह तामलवाडी पंचक्रोषीत दिसून येणार असल्याने आम्हीही चोख बंदोबस्त ठेवला होता. मान-पानाच्या कारणावरून किंवा इतर कारणावरून कोणताही अनुचित प्रकार घडू नये...याकडे आमचे पोलिस कर्मचारी लक्ष ठेवून होते. यामुळे कोठेही कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती सपोनि सचिन पंडित यांनी दिली. 
 
Top