काटी, दि. १८
तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ मंडळातील मंगरुळसह कसई, नांदुरी, कुंभारी, कदमवाडी परिसरात अतिवृष्टीमुळे शेतातील सोयाबीनच्या उभ्या पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे.
अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीनचे पीक अक्षरशः पाण्यात गेले होते. शेतात जागोजागी पाणी साठल्याने खरीप पिकांची पुरती वाट लागली. आधीच शेतकऱ्यांच्या पिकांना भाव मिळत नसल्याने व विविध संकटांचा सामना करावा लागत असताना अतिवृष्टीच्या या सुलतानी संकटामुळे शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आला आहे. या भागातील अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला बाहेर काढण्यासाठी भाजपचे ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विजय शिंगाडे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची कैफियत आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली.आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी तात्काळ दखल घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामा करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.
भाजपचे ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विजय शिंगाडे यांनी आ. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी सहाय्यक, तलाठी, ग्रामसेवक यांना प्रत्यक्ष बांधावर घेऊन जाऊन नुकसानीचा पंचनामा केला. तहसीलदार सौदागर तांदळे यांनी नुकसानीची पाहणी करुन अहवाल शासनाकडे पाठविला. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, राज्याचे प्रधान सचिव डवले यांनीही नुकसानीची पाहणी केली होती.
महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या पिकांच्या झालेल्या नुकसानीची दखल घेऊन मंगरुळ मंडळास 11 कोटी 92 लाख रुपये अनुदान मंजूर झाले असून मंगरुळ मंडळातील गावातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.अनुदान मंजूर झालेबद्दल मंडळातील शेतकऱ्यांच्या वतीने महाराष्ट्र शासनाचे भाजपचे ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विजय शिंगाडे यांनी आभार व्यक्त केले असून अनुदान न मिळालेल्या मंडळासही अनुदान मिळवून देण्यासाठी आ.राणाजगजितसिंह पाटील प्रयत्नशील असल्याचे विजय शिंगाडे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.