मुरूम, ता. उमरगा, ता.११ :
येथील श्री महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेची सन २०२१-२२ ची १३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (ता. ११) रोजी ज्ञानदान विद्यालयात पार पडली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन शिवशरण वरनाळे होते. प्रारंभी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राचार्य दत्तात्रय इंगळे, किसन खंडागळे, चंद्रकांत स्वामी, शरणाप्पा मेगंशेट्टी गुरुजी, संजय सावंत, देवराज बिराजदार, विठ्ठलराव पाटील, मल्लिनाथ सुपतगावे, संस्थेचे उपाध्यक्ष शरणप्पा मुदकण्णा, सचिव कमलाकर जाधव, संचालक आनंदराव बिराजदार आदींची उपस्थिती होती. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना प्राचार्य दत्तात्रय इंगळे यांनी संस्थेच्या वाटचालीमध्ये संचालक व सभासद यांचे मोठे योगदान, नातेसंबंध असून केवळ सभासदाच्या सहकार्यामुळेच पतसंस्थेची वाटचाल प्रगतीपथावर असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
या सभेचे प्रास्ताविक व अहवाल वाचन करताना वरनाळे म्हणाले की, यंदाच्या आर्थिक वर्षात या पतसंस्थेस २१ लाखाचा निव्वळ नफा झाल्याचे सांगून या पतसंस्थेकडे यंदा १ कोटी १२ लाख ६१ हजार ६५० रुपयाचे भाग भांडवल, ८ कोटी ३३ लाख १९ हजार ७४ रुपयाच्या ठेवी, संस्थेने ७ कोटी ३५ लाख ७९ हजार ७७२ रुपयाचे कर्ज वाटप केले. संस्थेची गुंतवणूक २ कोटी ६१ लाख ४ हजार ८३ रुपये असून या संस्थेचे ३८३९ सभासद, ऑडीट वर्ग 'अ' दर्जा प्राप्त, संपूर्ण संगणकीकृत, आयएफसी कोड, इंटरनेट बँकींग सुविधा उपलब्ध असणारी सेवाभावी पतसंस्था असून ठेवीवरील आकर्षक व्याजदर योजना यामध्ये महालक्ष्मी लखपती योजना, गणेश युवा मंगल योजना, स्वप्नपुर्ती योजना, सरस्वती मासिक प्राप्ती ठेव योजना, महावितरण कंपनीचे वीज बील भरणा केंद्र (मुरुम व उमरगा), सोने तारण कर्ज तर इतर तारण कर्ज आदी सोयी ग्राहकांच्या फायदयासाठी संस्थेकडून पुरविल्या जात आहेत. पतसंस्थेचे जिल्हा कार्यक्षेत्र वाढविण्याचा ठराव पास करण्यात आला. क्यु.आर. कोड व मोबाईल बँकिंग सेवा पुरविण्यात येणार आहे. पतसंस्थेच्या नूतन इमारतीत प्रवेश झाल्यापासून एक कोटी रुपयांच्या ठेवी वाढल्या असून संस्थेच्यावतीने महात्मा बसवेश्वर ग्रंथालय सुरू करण्यात आले असल्याचे शेवटी त्यांनी सांगितले. यावेळी उत्कृष्ट कर्जाची परतफेड करणाऱ्या कर्जदार सभासदांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या पतसंस्थेचे संचालक मनीष मुदकण्णा, अमृत वरनाळे, कॅशिअर चिदानंद स्वामी, प्रशांत काशेट्टी, सचिन कंटेकुरे, धिरज मुदकण्णा, राजेंद्र मुदकण्णा, संतोष मुदकण्णा, महांतय्या स्वामी, गुंडेराव गुरव आदींसह कर्मचारीवृंद व सभासद आदींनी पुढाकार घेतला. पतसंस्थेचे शाखाधिकारी दत्तात्रय कांबळे यांनी सभे पुढील विषय वाचन केले. सूत्रसंचालन मोहन जाधव तर आभार अशोक जाधव यांनी मानले. यावेळी बहुसंख्येने सभासद नागरिक उपस्थित होते.