प्रतिकात्मक
काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी आणि ग्रामपंचायतच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून सर्वच पक्षांतील लोकप्रतिनिधींना सक्षम उमेदवार शोधून निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करावी लागणार आहे.
सोसायटीच्या निवडणुकीत तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले असून 30 नोव्हेंबर रोजी फॉर्म काढून घेण्याची अंतिम तारीख असणार आहे. तर 11 डिसेंबरला सोसायटीसाठी मतदान होणार आहे तर ग्रामपंचायतसाठी 18 डिसेंबरला मतदान होणार असून ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 28 नाेव्हेंबर ते 2 डिसेंबर ही अंतिम तारीख असणार आहे. आणि दाखल उमेदवारी अर्जाची छाननी 5 डिसेंबरला होणार आहे, तर दाखल उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 7 डिसेंबर आहे. तर 18 डिसेंबरला मतदान व 20 तारखेला निकाल लागणार आहे. काटी ग्रामपंचायतीसाठी थेट जनतेतून सरपंचपदाच्या निवडीसाठी जनरल महिलांसाठी आरक्षण पडले आहे.
काटी येथील स्थानिक राजकारणाचा कणा समजली जाणारी ग्रामपंचायत निवडणुक ही स्थानिक राजकारणावर पकड मजबूत करण्याचे हे एक प्रभावी माध्यम व महत्वपूर्ण मानली जात असल्याचे काटी येथील जेष्ठ नागरिक तथा माजी प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. तसेच स्थानिक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सक्षम सुशिक्षित महिलांचा सहभाग होत नसल्याची खंत व्यक्त करून 73 आणि 74 व्या घटनादुरुस्तीनंतर स्त्रियांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 33 टक्क्यावरुन आरक्षण 50 टक्के झाले. परंतु स्थानिक गावपातळीवर सुशिक्षित महिलांचा सहभाग होत नसून नवऱ्याची जागा आरक्षित पडल्यामुळे महिलांना उभे केले जाते. परंतु अनेक ठिकाणी प्रशिक्षणाच्या माध्यमातून राजकारणाची माहिती घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये
गावपातळीवर महिलांनी राजकारणात आपला दबदबा असल्याचे दाखवून दिले असले तरी बऱ्याच ठिकाणी राजकारणात वावरणाऱ्या महिलांचा रबर स्टॅम्प सारखा वापर केल्याचे दिसून येते.त्यामुळे तुळजापूर तालुक्यातील काटी सारख्या सुशिक्षितांचे गाव म्हणून ओळख असलेल्या व राजकीय क्षेत्रातील महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत मध्ये स्थानिक सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी थेट जनतेतून जनरल महिलांसाठी आरक्षित असलेल्या जागेवर सक्षम पदवीधर,पदव्योत्तर,कायद्याचे ज्ञान असलेल्या सुशिक्षित महिलांना संधी देऊन त्यांना स्थानिक राजकारणात उतरविण्याची गरज असल्याचे मत माजी प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख (काटीकर) यांनी व्यक्त केले.