काटी, दि. ०७ :उमाजी गायकवाड
विधी सेवा प्राधिकरणच्या वतीने कायदेविषयक जनजागृती अभियान अंतर्गत तुळजापूर दिवाणी न्यायालयाच्या वतीने रविवार दि. 6 रोजी दुपारी 12 वाजता येथील ग्रामपंचायत कार्यालयात कायदेविषयक जनजागृती अभियान घेण्यात आले. तत्पूर्वी हे अभियान सकाळी माळुंब्रा व पांगरदरवाडी येथे हे शिबीर घेण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तुळजापूर दिवाणी व प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाचे दुसरे सहन्यायाधीश के.एस.कुलकर्णी होते.
यावेळी उपस्थितांना कायदेविषयक मार्गदर्शन करताना न्यायाधीश के.एस.कुलकर्णी म्हणाले की, लोकांनी आपले प्रलंबित तंटे सामंजस्याने मिटविण्यासाठी लोक न्यायालय, मध्यस्थी कक्षाच्या माध्यमातून प्रयत्न करावा. व येत्या 12 नोव्हेंबर रोजी तुळजापूर दिवाणी न्यायालयात लोक न्यायालय भरविण्यात येणार असून जास्तीत जास्त लोकांनी या लोक न्यायालयाच्या माध्यमातून आपसातील तंटे तडजोडीने मिटविण्याचे आवाहन केले.
शेत रस्ता मिळवण्यासाठी काय करावे. ॲड. दत्तात्रय घोडके
या कायदेविषयक जनजागृती शिबीरात मार्गदर्शन करताना ॲड.दत्तात्रय घोडके यांनी शेत रस्ता याविषयी सविस्तर मार्गदर्शन करताना म्हणाले की, जर आपला शेतात जाणारा रस्ता कोणी आडवला तर तो आपण कशा पद्धतीने खुला करू शकतो किंवा आपल्या शेतात जाण्यासाठी किंवा जी काही जमीन आपण घेतलेली असेल तेथे जाण्यासाठी जर रस्ता उपलब्ध नसेल किंवा तेथे जाण्यासाठी कोणी आड काठी करत असेल तर आपण कशा पद्धतीने तो रस्ता मिळू शकतो, शेत रस्त्यासाठी आपण कोणाकडे मागणी अर्ज करायचा आहे त्याच्या अटी नियम शर्ती काय असणार आहेत त्याच बरोबर कशा पद्धतीने तो रस्ता मिळवण्यासाठी आपण पाठ पुरावा करू शकतो आणि तो शेत रस्ता आपण आपला कसा मिळवू शकतो या विषयाची सविस्तर माहिती सांगताना तहसिलदारांकडे रस्ता मागणीचा अर्ज कसा करावा. स्वतःच्या शेतजमिनी मध्ये जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नसेल तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 143 अन्वये इतर भूमापन क्रमांकाच्या सिमांवरून रस्ता उपलब्ध करून देण्याचा अधिकार तहसिलदारांना असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या कामात स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
इंटरनेट वापरताना काळजी घेणे गरजेचे: जिथे अमिष दाखवले आहे तिथे निश्चित फसवणूक होते
सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित
सध्या इंटरनेट बॅंकींग क्षेत्रात इंन्सुरंन्स फ्रॉड कॉल,लोन, लॉटरी लागल्याचे फ्रॉड कॉल,फोन पे, गुगल पे याद्वारे अनेकांची फसवणूक होत असून
अनेकदा फ्रॉड कॉल येऊन आपल्या एटीएम,डेबीट कार्ड विषयी माहिती विचारून ओटीबी नंबर मागतात व त्यास अनेकजण फसवणूकीला बळी पडतात. हे कॉल शक्यतो बाहेर राज्यातून येत असल्याने तपासणीसाठी अडचणी येत असल्याचेही त्यांनी सांगितले. आजकाल सर्वांकडेच इंटरनेट असते, त्यामुळे त्याचा वापरही वाढला आहे. लोकांची कामे सहज, सोप्या पद्धतीने व्हावीत यासाठी सरकारतर्फेही अनेक कामे ऑनलाइन करण्याची सुविधा देण्यात आली आहे. तसेच प्रत्येक गावात इंटरनेट पोहोचावे यासाठीही सरकार प्रयत्नशील आहे.मात्र इंटरनेटच्या वाढत्या वापरासोबतच त्याचा गैरवापर होण्याचे प्रकारही खूप वाढले आहेत असे अनेक गुन्हे घडल्याची माहिती समोर आली आहे, जे सायबर क्राइम अंतर्गत येतात. सायबर क्राइमविरोधात लढा देण्यासाठी सरकारतर्फ कायदेही तयार करण्यात आले आहेत. सायबर क्राईमच्या घटना रोखण्यासाठी सरकारतर्फे माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 लागू करण्यात आला आहे. या कायद्याविषयी माहिती देताना तामलवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडीत म्हणाले की, इंटरनेटच्या वापरामुळे त्याचे उपयोग तर वाढले पण त्याचा गैरवापरही वाढला.त्यामुळे सायबर गुन्ह्यांच्या घटनाही वाढल्या आहेत. इंटरनेटच्या माध्यमातून बेकायदा काम करणे, चोरी करणे,इलेक्ट्रॉनिक मनी लॉन्ड्रिंग करणे इत्यादी घडणाऱ्या घटना या सायबर गुन्हे आहेत त्यापासून वाचण्यासाठी सरकारने माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 आणला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्याचसोबत बँकिंग फ्रॉडच्या प्रकरणातही लक्षणीय वाढ झाली असून असे प्रकार रोखण्यासाठी या कायद्याअंतर्गत कारवाई करुन दोषी व्यक्ती आढळल्यास त्याच्यावर आयटी ॲक्ट 2000 च्या कलम 77 बी,66 डी व कलम 66 B व 67 या अंतर्गत तसेच 66 C, 71, 73 आणि 74 या कलमांतर्गत कारवाई करता येऊ शकते असे सांगितले. जिथे आमिषे दाखवली जातात तिथे निश्चित फसवणूक होत असल्याचे सांगून अशा अमिषाला बळी न पडण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी न्यायाधीश के.एस.कुलकर्णी,ॲड.दत्तात्रय घोडके,ॲड.वडणे,ॲड.गवळी, ॲड. क्रांती थिटे,सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विक्रमसिंह देशमुख,सरपंच आदेश कोळी,ग्रामसेवक गोरे, सुजित हंगरगेकर,अशोक जाधव,प्रदीप साळुंके,रामहरी थोरबोले,अतुल सराफ,संजय महापुरे,अनिल बनसोडे, बाळासाहेब भाले,भागवत गुंड यांच्यासह अंगणवाडी,आशा कार्यकर्त्या उपस्थित होत्या.