नळदुर्ग, दि.११ :
महाराष्ट्रासह परराज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान, कुलदैवत असालेल्या श्री क्षेञ मैलारपूर ( नळदुर्ग ता. तुळजापूर ) येथील श्रीखंडोबाच्या दर्शनासाठी तिस-या रविवारी भाविकांनी प्रचंड गर्दी केली. कोरोना संसर्गजन्य आजारामुळे दोन वर्षाच्या प्रदिर्घ कालावधीनंतर मैलारपूर येथील मंदिर परिसर भक्तांनी फुलून गेल्याचे चिञ तिसऱ्या खेट्यास दिसून आले. त्याचबरोबर सर्वञ प्रसिध्द असलेल्या मैलारपूर कुस्ती आखाड्याचे उद्घाटन रविवारी मोठ्या थाटात करण्यात आले.
श्री खंडोबाच्या मुख्य स्थानापैकी नळदुर्ग (मैलारपूर ) हे एक आहे. रविवारी सकाळपासूनच मैलारपूर मंदिराबाहेर दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्याचे चिञ होते.
श्री खंडोबा व बाणाईचा विवाह सोहळा नळदुर्ग भुईकोट किल्ल्यात झाल्याची आख्यायिका आहे. श्री खंडोबाची मुर्ती तुळजापूर तालुक्यातील अणदूर गावामध्ये सव्वा दहा महिने आणि नळदुर्गच्या मैलारपूर मध्ये पावणे दोन महिने वास्तव्यास असते. मुर्ती देवाणघेवाण संबधी अणदुर व नळदुर्गच्या मानक-यामध्ये लेखी करार होतो. दोन मंदिर माञ देवाची एकच मुर्ती असण्याचे हे दुर्मिळ उदाहरण आहे. वर्षभर "श्री " ची मुर्ती नळदुर्ग (मैलारपूर) येथे नसतानाही भाविक श्री खंडोबाचे मुख्य स्थान मैलारपूर हे असल्यामुळे दर्शनासाठी येतात. मैलारपूर ( नळदुर्ग ) येथील श्री खंडोबाची याञा दरवर्षी पौष पोर्णिमेस भरते. या याञेस लाखो भाविक येतात.
मैलारपूर कुस्ती आखाड्याचे उद्घाटन
यावर्षी मैलारपूर याञेनिमित्त कुस्ती स्पर्धा दि.७ जानेवारी २०२३ रोजी संपन्न होणार आहे. या कुस्ती स्पर्धेचे आयोजन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अशोक जगदाळे यांनी केले आहे. या भव्य कुस्ती स्पर्धेची जय्यत तयारी आतापासुनच करण्यात येत आहे. मैलारपुर येथील या भव्य कुस्ती स्पर्धेच्या आखाड्याचे पुजन रविवार दि.११ डिसेंबर रोजी राष्ट्रवादीचे अशोक जगदाळे यांच्या हास्ते करण्यात आले. यावेळी श्री खंडोबा देवस्थान कुस्ती आखाडा समितीचे अध्यक्ष राजाभाऊ ठाकुर,शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख कमलाकर चव्हाण, माजी नगरसेवक नितीन कासार, अमृत पुदाले,संजय मोरे, सुधीर हजारे, किशोर नळदुर्गकर, शरीफ शेख, नळदुर्ग शहर पञकार संघटनेचे अध्यक्ष सुहास येडगे , सदस्य विलास येडगे, अंबाबाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रमेश जाधव, शिवाजी वऱ्हाडे, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन संजय बेडगे, व्हाईस चेअरमन ताजोद्दीन सय्यद, भाजयुमोचे जिल्हा सचिव श्रमिक पोतदार, विशाल डुकरे, कुस्ती समितीचे उपाध्यक्ष अनिल पुदाले,सुधाकर चव्हाण, सतीश पुदाले आदीजण उपस्थित होते.