नळदुर्ग , दि. १३
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने न.प.चे मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांना प्रधानमंञी आवास योजनेचे लाभार्थीना रखडलेले अनुदान तातडीने संबधित विभागाच्या अधिकाऱ्याकडे योग्य तो पाठपुरावा करून आवास योजनेतील लाभार्थ्यांना बांधकामाचे हप्ते लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी याना देण्यात आले आहे.
शहरात सद्या मोठ्या प्रमाणात प्रधानमंत्री घरकुल आवास योजने अंतर्गत लाभार्थी आपले राहते घरे पाडून पक्के घरे बांधकाम करत आहेत. अनेकांच्या घरांचे बांधकाम पूर्ण झाले असून मोठ्या प्रमाणात इतर लाभार्थीची बांधकामे सुरू आहेत. परंतु गेली २ महिने झाले . या लाभार्थींना बांधकामाचे हप्तेच मिळाले नसल्याने बांधकाम अर्धवट ठेवण्याची वेळ येत आहे.कारण बांधकाम सुरू करण्यासाठी खासगी सावकाराकडून व्याजाने पैसे घेऊन बांधकामास सुरुवात केल्याचे सांगुन बांधकामाचे हप्ते मिळत नसल्याने कामे अर्धवट ठेवण्याची वेळ आली,यामुळे त्या बांधकामावर काम करत असलेल्या कामगारांना ही त्यांचा मोबदला मिळत नाही,त्यामुळे ते ही आर्थिक संकटात सापडले आहेत.आपले नाव यादीतून कमी होईल व नगरपालिकेने ज्या प्रकारे संबधिताना नोटिसा बजावल्या त्या भीतीपोटी खासगी सावकाराकडून कर्ज घेऊन राहते घरे पाडून बांधकामास सुरूवात केली होती,पण आता या लाभार्थीना बांधकामाचे हप्ते मिळत नसल्याने बांधकाम अर्धवट ठेवण्याशिवाय व दुसऱ्याच्या घरात किरायाने राहून इतर आर्थिक भुर्दंड सहन केल्याशिवाय पर्याय उरत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
या निवेदनावर मनसेचे जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे,शहराध्यक्ष अलीम शेख,शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी,शहर संघटक रवि राठोड यांच्या स्वाक्ष-या आहेत.