सावरगाव येथे गणेशोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 128 जणांचे रक्तदान
काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील संत सावता माळी ग्रुप प्रणित सार्वजनिक शिवस्मारक तरुण मंडळ गणेशोत्सवानिमित्त सोमवार दि. 25 रोजी घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 128 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
|दररोज रक्ताची भासणारी गरज आणि दुसरीकडे रक्ताची निर्माण होणारी टंचाई लक्षात घेता सामाजिक जाणिवेतून येथील संत सावता माळी प्रणित सार्वजनिक शिवस्मारक तरुण मंडळ गणेशोत्सव समितीच्या वतीने येथील मल्लिकार्जुन मंदिर चौकातील सभागृहात रक्तदान शिबीर घेण्यात आले. यावेळी सर्वसामान्य शेतकरी गणपत भिवा हागरे यांच्या शुभहस्ते या रक्तदान शिबिराचे उदघाटन करण्यात आले.
या रक्तदान शिबिरात गावातील महिला व पुरुष गणेश भक्तांनी अशा एकूण 128 रक्तदात्यांनी रक्तदान केले. तर सोलापूर येथील अक्षय ब्लड बँक रक्तपेढीच्या चमूने रक्त संकलनाचे काम केले.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती तथा भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, मा. जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील, माजी सरपंच रामेश्वर तोडकरी, माजी उपसरपंच आनंद बोबडे, तामलवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशीलकुमार चव्हाण, काशिनाथ राऊत, रामेश्वर राऊत आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
हे भव्य रक्तदान शिबीर यशस्वीतेसाठी शिवस्मारक तरुण मंडळ प्रणित संत सावता माळी ग्रुपच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.