हुतात्मा जवानांना श्रद्धांजली देण्याकरिता
भारतीय लष्कराची तुकडी तुळजापूरला येणार
उस्मानाबाद,दि.12:
1724 ते 1948 असे 224 वर्षे मराठवाड्यावर हैद्राबादच्या निजामाचे राज्य होते. ते मुक्त करण्याकरिता भारत सरकारच्या वतीने ऑपरेशन पोलो नावाने जी कारवाई करण्यात आली होती. त्यामध्ये स्वातंत्र्य सैनिकाबरोबरच भारतीय सैन्याने मोठी कामगिरी केलेली आहे. यावेळी 3 कॅवलरी रेजिमेंटचे जवान या कारवाईत सहभागी झाले होते. त्यानुसार 13 सप्टेंबर 1948 ला तुळजापूरच्या घाटशीळ परिसरात निजाम सैन्याबरोबर झालेल्या लढाईत भारतीय सैन्याने विजय मिळवून हैद्राबादच्या दिशेने जाण्यास सुरुवात केली.
त्यावेळी आपल्या सैनिकांची एक तुकडी तुळजापूरचा घाट चढून आजच्या छत्रपती शिवाजी चौक परिसरातील मैदानात थांबली असताना बेसावध असणाऱ्या आपल्या भारतीय सैनिकावर रझाकारांनी पाठीमागून गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. यामध्ये 3 कॅवलरीचे दोन जवान जमादार हरिराजसिंग आणि जमादार मांगेराम यांना वीरमरण आले. त्यानंतर पुढे छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पुतळ्याच्या पाठीमागे या दोन जवानांच्या समाधी बनविण्यात आल्या आहेत. याबाबत विशेष माहिती नव्हती. म्हणून यावर इतिहास संशोधक डॉ. सतीश कदम यांनी संशोधन करून संबंधित जवानांच्या वारसदारांचा शोध घेऊन त्यांच्याशी आणि भारतीय लष्करातील 3 कॅवलरीच्या रेजिमेंटसोबत संपर्क केला.
2023 हे वर्ष आजादी का अमृत महोत्सव म्हणून साजरे होत असताना उस्मानाबाद जिल्हा प्रशासनाच्या वतीने सायकल रॅलीचे आयोजन केले आहे आणि 3 कॅवलरीच्या जवानांची एक तुकडी या दोन हुतात्मा जवानांना मानवंदना देण्याकरिता येत आहे. यासोबतच हुतात्मा झालेल्या दोन जवानांचे वारसदारही येत आहेत. 13 सप्टेंबर 2023 या दिवशी सकाळी 9.30 वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याकरिता अधिकाधिक संख्येने नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी केले आहे.