वागदरी व नळदुर्ग परिसरात पोळा सण उत्साहात साजरा
वागदरी ,दि.१५ (एस.के.गायकवाड):
दुष्काळाच्या सावटाखाली तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग व वागदरी परिसरात बैल पोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
शेकऱ्याच्या शेतात आयुष्यभर काबाडकष्ट करणाऱ्या बैलांच्या श्रमाला वर्षांतून एकदा तरी प्रतिष्ठा मिळवून देणारा सण म्हणजे बैल पोळा हा सण होय.
यावर्षी पावसाने तब्बल दोन महिने दडी मारल्याने नदी नाले कोरडे पडले, खरीप हंगामातील पिकाने माना टाकल्या,जवळपास दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. परंतु गेल्या आठवड्यात सलाईन लावल्यागत पाऊस पडला.त्यामुळे ऊसने आवसान आणून बळीराजा बैल पोळा हा सण साजरा करण्यासाठी उत्साहात पुढे सरसावला.खर तर रिमझिम पावसात हा सण साजरा करताना एक वेगळाच आनंद असतो. नदीच्या डोहात बैलांना अंघोळ घालणे, त्यांना पोहायला लावणे, वगैरेचा आनंद यावेळी वरूण राजा रूसल्याने शेतकऱ्यांना घेता आला नाही. परंतु उपलब्ध पाण्यात साबण ,शांपू लावून आपल्या बैलांना आंघोळ घालून हाळदी माती लावून रंगरंगोटी करून मानासन्मानाने पती पत्नी व कुटुंबातील प्रतिनिधी मिळून बैलांची व पशूधनाची पुजा करून उत्साहात त्यांची गावातून मिरवणूक काढून बैल पोळा हा सण साजरा केला.महिलानीही या सणामध्ये आनंदाने सहभाग नोंदवला.