येणाऱ्या पिढीने सैन्य दलात भरती होऊन देशसेवा करावी- जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंम्बासे
        

उस्मानाबाद.दि.13,

देशाच्या सैन्य दलातील जवानांकडून प्रेरणा घेऊन येणाऱ्या पिढीने भारतीय सैन्य दलात भरती होऊन देशसेवा करावी. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी आज १३सप्टेंबर रोजी तुळजापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ऑपरेशन पोलोमध्ये सहभागी झालेले हवालदार हरिराज सिंघ आणि हवालदार मांगेराम यांच्या समाधीवर पुष्पचक्र अर्पण केल्यानंतर व त्यांच्या वारसांच्या सत्कार समारंभ प्रसंगी उपस्थित सैनिकी शाळेतील विद्यार्थ्यांना केले.
      
   यावेळी आमदार राणा जगजितसिंह पाटील,हुतात्मा जमादार हरिराज सिंघ यांचे पुत्र कर्नल देवेंद्र सिंग शिहोरी, नातू कर्नल विवेक शिहोरी,हुतात्मा मांगेराम यांचे पुत्र सुनील मल्हन, इतिहास संशोधक प्रा.डॉ.सतीश कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
       

जिल्हाधिकारी डॉ.ओम्बासे पुढे म्हणाले की,मराठवाड्याला हैद्राबादच्या निजामशाहीपासुन  मुक्त करण्याकरिता ऑपरेशन पोलो ही कारवाई करण्यात आली होती. त्यामध्ये स्वातंत्र्य सैनिकाबरोबरच भारतीय सैन्याने मोठी कामगिरी केली. 


यावेळी 3 कॅवलरी रेजिमेंटचे जवान या कारवाईत सहभागी झाले होते. आणि यातील दोन जवान यावेळी शहीद झाले.त्यानुसार १३ सप्टेंबर १९४८ ला तुळजापूरच्या घाटशीळ परिसरात निजाम सैन्याबरोबर झालेल्या लढाईत भारतीय सैन्याने विजय मिळवून हैद्राबादच्या दिशेने जाण्यास सुरुवात केली.त्यावेळी आपल्या सैनिकांची एक तुकडी तुळजापूरचा घाट चढून आजच्या छत्रपती शिवाजी चौक परिसरातील मैदानात थांबली असताना बेसावध असणाऱ्या आपल्या भारतीय सैनिकावर रझाकारांनी पाठीमागून गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. यामध्ये ३ कॅवलरीचे दोन जवान जमादार हरिराजसिंग आणि जमादार मांगेराम यांना वीरमरण आले.त्यानंतर पुढे छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पुतळ्याच्या पाठीमागे या दोन जवानांच्या समाधी बनविण्यात आल्या आहेत.यावर इतिहास संशोधक डॉ. सतीश कदम यांनी संशोधन करून संबंधित जवानांच्या वारसदारांचा शोध घेऊन त्यांच्याशी आणि भारतीय लष्करातील ३ कॅवलरीच्या रेजिमेंटसोबत संपर्क केला आणि प्रत्यक्ष या हुतात्म्यांच्या समाधीस मानवंदन करण्यात आले.असेही त्यांनी सांगितले.


      यावेळी शहीद सैनिकांच्या वारसांना मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.३ कॅवेलरीचे जवानांना  श्री तुळजाभवानी देवीचे चित्र देऊन सन्मानित करण्यात आले.आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांनी शहिदांच्या स्मारकासाठी २५ लक्ष रुपये खर्च करून भव्य स्मृती स्तंभ उभारण्यात येईल अशी घोषणा केली.    
      

प्रास्ताविक डॉ. सतीश कदम यांनी केले.याप्रसंगी हुतात्म्यांच्या वारसदार आणि भारतीय सैनिकांच्या हस्ते माझी माती माझा देश या कलशात तुळजापूर तालुक्यातील माती भरण्यात आली.यावेळी महसूल विभागाचे अधिकारी आणि माजी सैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
                                     
 
Top