आयुष्मान भव: मोहिमेचे पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या हस्ते ऑनलाईन उदघाटन 


 

उस्मानाबाद,दि.13  


उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात आज दि.13 सप्टेंबर रोजी आयुष्मान भव: मोहिमेचे राज्याचे आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या हस्ते ऑनलाईन प्रणालीद्वारे उद्धाटन करण्यात आले. आयुष्मान भव: मोहिम दरम्यान 17 सप्टेंबर पर्यंत सेवा सप्ताह म्हणून राबविण्यात येणार आहे. या मोहिमेमध्ये समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक व आशा स्वयंसेविका यांनी गृहभेटी देवून उपशामक सेवा आवश्यक असलेल्या रुग्णांना सेवा देण्यात येत आहे. रुग्णांना व नातेवाईकांना रुग्णांची काळजी कशी घ्यावी याबद्दल मार्गदर्शन व समुपदेशन देणार आहेत.

         

 तसेच आयुष्मान भव: मोहिम सेवा पंधरवाडा 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2023 या कालावधीमध्ये राबविण्यात येणार आहे. या पंधरवाडामध्ये ग्रामपंचायत, जन आरोग्य समिती व रुग्ण कल्याण समिती यांच्यामार्फत सर्व आरोग्य संस्थामध्ये स्वच्छतेसाठी विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमामध्ये रक्तदान शिबीर, अवयव दानाची प्रतिज्ञा आयुष्मान सभेमध्ये घेण्यात येणार आहे. या मोहिम दरम्यान आयुष्मान कार्ड नोंदणी करण्यात येणार आहे. याकरिता लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत सदस्य, जन आरोग्य समिती सदस्य व रुग्ण कल्याण समिती यांनी या आयुष्मान भव: मोहिम दरम्यान सहभाग घेवून ही मोहिम यशस्वी करावी. या पंधरवाडामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये असंसर्गजन्य आजार सेवा दुसऱ्या आठवड्यामध्ये क्षयरोग, कुष्ठरोग व इतर संसर्गजन्य आजार, तिसऱ्या आठवड्यामध्ये माता बाल आरोग्य व पोषण आरोग्य सुविधा व चौथ्या आठवड्यामध्ये सिकलसेल व नेत्ररोग चिकित्सा, कान, नाक व घसा या सर्व रुग्णांची तपासणी, निदान, उपचार व संदर्भ सेवा देण्यात येणार आहे. वैद्यकीय महाविद्यालय व आरोग्य विभाग यांच्या समन्वयाने ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय येथे दर आठवड्यात आरोग्य मेळाव्याचे आयोजन होणार आहे. जिल्ह्यातील आरोग्य संस्थेतील सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी अंगणवाडी, शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना संसर्ग नियंत्रण व प्रतिबंधात्मक उपायाबाबतची माहिती देण्यात येणार आहे.

         

 आयुष्मान भव: मोहिम दरम्यान प्रमुख अतिथी म्हणून विधान परिषद सदस्य पदवीधर मतदार संघ आमदार सतिश चव्हाण, शिक्षक विधान परिषद सदस्य विक्रम काळे, विधानपरिषद सदस्य सुरेश धस, विधानसभा सदस्य आमदार राणाजगजितसिंह पाटील, कैलास दादा घाडगे पाटील, ज्ञानराज चौगुले व जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, लातूर आरोग्य सेवा परिमंडळाच्या उपसंचालक डॉ.अर्चना भोसले, जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ.एस.एल.हरिदास, शासकीय रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.ईस्माईल मुल्ला, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मारोती कोरे, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.कुलदिप मिटकरी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवाजी फुलारी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.तानाजी लाकाळ, डॉ.सुशिल चव्हाण, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.रफीक अंन्सारी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.चंद्रकांत ऐवाळे, जिल्हा संनियंत्रण व मुल्यमापन अधिकारी किशोर तांदळे, जिल्हा समन्वयक डॉ.पल्लवी धनके आणि सर्व जिल्हास्तरीय अधिकारी व कर्मचारी या कार्यक्रमास उपस्थित होते.

 
Top